
कोल्हापूर :- SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी भीती खा. संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे.
खा. संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले आहे की, ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. मात्र यावेळीदेखील शासनाने मराठा विद्यार्थ्यांची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेशाच्या अधिसंख्य (Super Numerary) जागा निर्माण करून उपाययोजना करण्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मी हा मार्ग सुचवला होता, मात्र अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर सुपर न्युमररी जागा निर्माण करुन SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी. या बैठकीत सुपर न्युमररी जागांबाबत कायदेशीर विशेषाधिकार वापरुन निर्णय घेण्याचा शासनाला असलेला अधिकार सुचवून त्याच्या अंमलबजावणी बाबत सविस्तर चर्चा करु ; यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. समाजाची भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला