भारताच्या कृष्णन पिता-पुत्रांच्या विक्रमाची सेबॕस्टियन कोर्डाने केली बरोबरी

Maharashtra Today

अमेरिकन टेनिसपटू सेबॕस्टियन कोर्डा (Sebastian Korda) याने पर्मा (Parma) येथील एमिलिया रोमाग्ना ओपन स्पर्धा जिंकून पहिले एटीपी (ATP) विजेतेपद पटकावले. 20 वर्षाच्या या खेळाडूने अंतिम सामन्यात मार्को सेच्चिनाटो याच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळवला आणि यासह एक विशेष पराक्रम केला. तो असा की असोसिएशन आॕफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP) टूरमधील स्पर्धेत अजिंक्य ठरलेला तो तिसरा पुत्र ठरला.

त्याचे वडिल पीटर कोर्डा (Petr Korda) हेसुध्दा नामवंत यशस्वी टेनिसपटू राहिलेले आहेत. पीटर यांनी 1998 च्या आॕस्ट्रेलियन ओपन या ग्रँड स्लॕम स्पर्धेसह एकूण 10 विजेतेपदं पटकावलेली आहेत आणि आता सेबॕस्टियनने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत विजेतेपदांची सुरुवात केली आहे. गंमत म्हणजे पीटर कोर्डा हे झेक गणराज्यासाठी खेळले होते तर सेबॕस्टियन अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतो. याप्रकारे पिता-पुत्र असले तरी ते वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करतात.

व्यावसायिक टेनिसच्या इतिहासात एटीपी विजेतेपद नावावर लावणारे कोर्डा हे केवळ तिसरेच पिता-पुत्र आहेत. त्यांच्याआधी भारताच्या रामनाथन कृष्णन (Ramnathan Krishnan) व रमेश कृष्णन (Ramesh Krishnan) आणि आॕस्ट्रेलियाच्या फिल डेंट व अमेरिकेच्या टेलर डेंट या पिता-पुत्रांनीसुध्दा व्यावसायिक टेनिस स्पर्धांमध्ये एकेरीचे विजेतेपदं पटकावली आहेत. कोर्डा पिता-पुत्रांप्रमाणेच डेंट पिता-पुत्रसुध्दा वेगवेगळ्या देशांसाठी खेळले आहेत.

टेनिसमध्ये खुले युग सुरू होण्याआधी खेळलेले रामनाथन कृष्णन यांच्या नावावर एकेरीची 55 विजेतेपदं आहेत. विम्बल्डनची त्यांनी दोन वेळा उपांत्य फेरी गाठली होती आणि त्यांचाच वारसा समर्थपणे पुढे चालवलेल्या रमेश कृष्णन यांनी एकेरीची आठ विजेतेपदं आपल्या नावावर केली आहेत.

फिलिप डेंट यांच्या नावावर तीन विजेतेपदं आहेत तर त्यांचा मुलगा टेलर हा चार स्पर्धांत एकेरीत विजेता ठरला होता. मात्र टेलर हा एकाही ग्रँड स्लॕम स्पर्धेत चौथ्या फेरीच्या पुढे मजल मारू शकला नव्हता पण त्याचे वडिल फिलीप यांनी 1974 च्या आॕस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.

सेबॕस्टियनच्या पर्मा येथील विजेतेपदाचे वैशिष्ट्य म्हणजे एकही सेट न गमावता तो या स्पर्धेचा विजेता ठरला. यंदाच त्याने पहिल्यांदा एटीपी टूर स्पर्धेची अंतिम फेरी डेलरै बीच ओपन येथे गाठली होती.

जागतिक क्रमवारीत 63 व्या स्थानी असलेला सेबॕस्टियन आपल्या पहिल्या विजेतेपदाबद्दल म्हणाला की, या यशाचा मार्ग सोपा नव्हता. माझ्या मार्गात तीन इटालियन खेळाडू होते आणि इटलीत इटालियन खेळाडूंचा सामना करणे सोपे नसते. पण मी त्यांच्यावर मात करत हे यश मिळवले आहे. त्याच्या यशामुळे 11 वर्षात पहिल्यांदाच कुणी अमेरिकन खेळाडू युरोपियन क्ले कोर्ट स्पर्धेत विजेता ठरला आहै.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button