काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासाठी बिगर मराठा चेहऱ्याचा शोध ?

Congress faces a deeper crisis

मुंबई :  राज्याचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असावा याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांचा कल जाणून घेतला. बदल करायचा असेल तर बिगर मराठा चेहरा द्या, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती आहे. बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या राज्यातल्या तीन बड्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली.

दरम्यान, काही मंत्र्यांनी थोरात यांनाच प्रदेशध्यक्षपदी कायम ठेवावे, असे म्हटल्याचेही वृत्त आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष मराठा समाजाचा नसावा; कारण नुकतेच मुंबई काँग्रेस अध्यक्ष नेमले गेलेले भाई जगताप मराठा आहेत. नवा प्रदेशाध्यक्षही मराठाच नेमला तर सीएलपी, मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा  तीनही पदांवर मराठा समाजाचीच व्यक्ती असेल. म्हणून बदल करायचाच असेल तर जातीय संतुलनात बिगर मराठा चेहरा देण्याची गरज आहे, अशी सूचना एका ज्येष्ठ नेत्याने या बैठकीत केली.

जातीचे राजकारण

बाळासाहेब थोरात यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला दीडच वर्ष झाले आहे. पण सध्या सीएलपी, महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद ही तीनही पदे  त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसमधल्या एका गटाने ही ‘बिगर मराठा’ मोहीम सुरू केल्याची चर्चा आहे. बिगर मराठा हे समीकरण ग्राह्य धरले तर या शर्यतीतले अनेक चेहरे आपोआप बाद होतात. दलित आणि आदिवासींबाबतच्या योजनांना निधी मिळत नाही म्हणून सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.

त्याची जोरदार चर्चाही झाली. काँग्रेस सर्व घटकांचा विचार करते हे दाखवण्याचा हायकमांडचा तो प्रयत्न होता. महाराष्ट्रात सध्या भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मराठा आहेत. अशा स्थितीत जो विचार पत्राबाबत केला होता तो नेतृत्वनिवडीबाबतही करून काँग्रेस सर्वसमावेशकता दाखवणार का, हा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER