पवारांचे मिशन पुणे महापालिका; प्रशांत जगताप यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

पुणे : पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या शहराध्यक्षपदासाठी अखेर माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांची नियुक्ती केली गेली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. जगताप यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जगताप यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेत्यांनी प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना मोठी जबाबदारी सोपविली आहे. जगताप यांनी महापौर, पीएमपीएल संचालक अशी  अनेक पदे भूषविली आहेत. पुणे महापालिकेत जवळपास २१ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. २०१६ ते २०१७ या कालावधी दरम्यान  त्यांनी पुण्याच्या  महापौरपदाचा कार्यभार सांभाळला. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे.

तसेच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंधदेखील आहेत. सुप्रिया सुळे यांचे जवळचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. जगताप यांनी महापौरपदावर असताना अतिशय कार्यक्षमपणे आणि सक्षमपणे काम केले असून त्यांचा अनुभव पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button