केंद्राच्या निर्णयानंतर मूर्तिकार राज ठाकरेंच्या दरबारात; राज यांनी दिला मोलाचा सल्ला

Raj Thackeray

मुंबई :- केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरीसवर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्ती घडवणं मूर्तिकारांना कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, या मागणीसाठी पेणमधील मूर्तिकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. (Raj Thackeray comment after meeting with Pen Idol Maker Delegation). मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंचे (Raj Thackeray) कृष्णकुंज हे गेल्या काही दिवसांपासून सामान्यांसाठी न्यायाचे मंदिर ठरत आहे. आतापर्यंत न्याय मागण्यासाठी, मागण्या पूर्ण  करून घेण्यासाठी डॉक्टरांचे शिष्टमंडळ, पुजारी, वीज बिल ग्राहक, कोळी महिला , जिमचालक, डबेवाले आणि आता मूर्तिकार  आपल्या मागण्या घेऊन राज ठाकरेंच्या दरबारात पोहचलेत.

राज ठाकरे यांनीही मूर्तिकारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे व त्यांना काही सूचनाही केल्या आहेत. तसेच, वेळीच यावर आपण मार्ग काढला नाही तर काही धोक्याच्या सूचनाही राज यांनी मूर्तिकारांना दिल्या आहेत.

केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ   पॅरीसवर बंदी घातल्याने सर्वांत  मोठा फटका मूर्तिकारांना बसणार आहे. परंतु, हे  तेवढेच खरे आहे की, ‘प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती  विसर्जनानंतर पुन्हा किनाऱ्यावर येतात. ते चित्र फार भीषण असतं. त्या पटकन विरघळत नाहीत. त्यामुळे त्यावर तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरे मूर्तिकारांना म्हणाले, ‘तुम्ही एक वेगळा विचार करून बघा, होतंय का? जमतं का? पण मी तुम्हाला एक धोका सांगून ठेवतो, जर उद्या परदेशातून मूर्ती आल्या तर तुम्ही काहीही करू  शकत नाही,’ अशी धोक्याची सूचना राज ठाकरेंनी मूर्तिकारांना दिली.त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी मी सरकारशी बोलेन, असे आश्वासनही मूर्तिकारांना दिले.

ते म्हणाले, तुमच्या मूर्तींमुळे जलाशयात प्रदूषण होतं असा काही भाग नाही. पण त्यात हादेखील एक भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर विचार करून मार्ग काढता आला. त्यामुळे यावर तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे. पीओपीची मूर्ती विरघळण्यास आठ दिवस जातात.

‘POP मुळे नदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. ते पटकन विरघळत नाही. विसर्जनानंतर तुम्ही जर कोणत्याही चौपाट्या बघितल्या तर त्यावर असंख्य गणपतीच्या मूर्ती दिसतात. हे चित्र फार भीषण असतं. आपण इतक्या श्रद्धेने त्या गणपती बाप्पाचे पूजन करतो. त्याचे विसर्जन करतो. दुसऱ्या दिवशी त्या मूर्ती पुन्हा किनाऱ्याजवळ आलेल्या असतात. ते दृश्य  बघायला खूप विदारक असतं. त्यामुळे अशा वेळी जेवढ्या जमेल तेवढ्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणं हे जास्त संयुक्तिक असेल,’ असंही राज ठाकरे म्हणाले.

‘पीओपीच्या मूर्त्या आपण आतापर्यंत केल्या आहे. मात्र त्याचे दुष्परिणामही समोर आले आहेत. त्यावर तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. समुद्रात किंवा नदीत त्याचे विघटन लवकर होईल. तुमचं कामही सोयीचं होईल.’ असेही राज ठाकरेंनी सांगितले.

त्यामुळे राज ठाकरे मूर्तिकारांना म्हणाले, तुम्ही मूर्ती बनवण्याच्या दृष्टीने वेगळा काही मार्ग निघतो का याचा विचार करा. त्यासोबतच मी सरकारमधील कोणी व्यक्ती असेल त्याच्याशी चर्चा करतो की समुद्रात विसर्जनासाठी याचा काही वेगळा पर्याय होईल का? तोपर्यंत मी बोलून घेतो, असे आश्वासनही राज ठाकरेंनी मूर्तिकारांच्या शिष्टमंडळाला दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER