खासदार इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मुख्यमंत्र्यांसमोरच वाद

Imtiaz Jalil - Chandrakant Khaire

औरंगाबाद :- ‘औरंगाबाद’ आणि ‘संभाजीनगर’ या शब्दांवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच वाद झाला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी विभागीय जिल्हावार बैठका घेतल्या. यावेळी हा वाद झाला.

बैठकीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे दोघेही उपस्थित होते. जलील यांनी आपल्या समस्या मांडताना ‘औरंगाबाद’ असा उल्लेख करीत आपली समस्या मांडली. खैरे मात्र त्यांना औरंगाबाद नाही तर ‘संभाजीनगर’ म्हणा असे वारंवार सांगत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही औरंगाबादचा उल्लेख आपल्या भाषणातसुद्धा संभाजीनगर असाच उल्लेख केला.

याविषयी इम्तियाज जलील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, आता त्यांची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री खुद्द उद्धव ठाकरे आहेत ते काहीही म्हणू शकतात. त्यांचे संभाजीनगर असले तरी माझे हे औरंगाबादच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून त्यांच्यात बैठकीतच खडाजंगी झाल्याने बैठकीची कमी आणि वादाचीच चर्चा जास्त झाली.