फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये शुमाकर नाव पुन्हा चमकणार

Mick Schumacher

फॉर्म्युला वन (Formula one) मोटार रेसिंगच्या (Motor Racing) विश्वात शुमाकर (Schumacher) हे नाव पुन्हा एकदा कानी पडणार आहे. सात वेळचे विश्वविजेते मायकेल शुमाकर यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये निवृत्ती पत्करल्यापासून हे जर्मन नाव चमकत नव्हते; पण आता ते पुन्हा चमकणार आहे; कारण मायकेल शुमाकरचा (Michael Schumacher) मुलगा मिक (Mick Schumacher) आता रेसिंगच्या ट्रॕकवर उतरणार आहे.

२०२१ च्या मोसमात तो हास फॉर्म्युला वन टीमसाठी रेसिंग करणार आहे. २१ वर्षीय मिक हा सध्या फॉर्म्युला टू चॅम्पियनशिपमध्ये आघाडीवर आहे. त्याने हास फॉर्म्युला वन टीमशी बहुवार्षिक करार केला आहे. याबद्दल मिकने म्हटलेय की, पुढल्या वर्षी मी फॉर्म्युला वनमध्ये असेन. याबद्दल मी अतिशय आनंदी आहे आणि काय बोलावे ते मला सुचेनासे झाले आहे. फॉर्म्युला वनमध्ये सहभाग हे माझे सुरुवातीपासून स्वप्न होते. मिक शुमाकर हा फेरारीच्या यंग ड्रायव्हर अकॅडमीचा सदस्य असून हास एफ वन टीममध्ये त्याच्यासोबत रशियाचा निकिता मेझपीन आहे.

ही जोडी अलीकडेच बहारीन ग्रँड प्रिक्समध्ये अपघातात भाजलेला रोमेन ग्रोजॉन व डेन्मार्कच्या केव्हिन मॕग्नुस्सेन यांची जागा घेईल. हास फेरारीसोबत मिकची पहिली रेस या शुक्रवारी अबुधाबी येथे असेल. वर्षअखेरच्या या ग्रँड प्रिक्स स्पर्धेसाठी तो हासच्या सरावाच्या टीममध्ये असेल.

फॉर्म्युला टू रेसिंगच्या माध्यमातून नेहमीच फॉर्म्युला वनसाठी गुणवान खेळाडू समोर आले आहेत आणि यंदा तर फॉर्म्युला टूमध्ये फारच स्पर्धात्मक स्थिती होती आणि मिकने आपल्या कामगिरीच्या बळावर फॉर्म्युला वनमध्ये स्थान मिळवले आहे, असे ‘हास’चे प्रमुख गुंथर स्टेनर यांनी म्हटले आहे. फॉर्म्युला टू रेसिंगमध्ये यंदा अजून दोन शर्यती बाकी आहेत आणि मिक १४ गुणांच्या फरकाने आघाडीवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER