
पुणे : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. मात्र, अद्याप पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग बंदच असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही शाळांमध्ये (School) केवळ शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. विद्यार्थी कॉलेज (College) सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा मार्च महिन्यापासून बंद होत्या. 15 जून रोजी शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांविना सुरू झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास परवानगी दिली. पालकांचे संमतीपत्र घेऊन वर्ग सुरू झाले आहेत. सध्या नववी ते बारावीच्या वर्गात 70 ते 75 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. त्यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. 11 ते 2 यावेळेत केवळ चार तास घेतले जातात. अद्याप 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती कोणत्याच शाळेत नसल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह अध्यापनाद्वारे ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्यात आले आहेत. कोरोनाचे शासकीय नियमांचे पालन करून पाचवी व आठवीचे शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अद्याप शाळा सुरू करण्याबाबत सरकारकडून निर्देश नसल्याने शाळा सुरू करता येत नसल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला