संस्कृतीची ‘शाळा’

जेव्हा मुलगी शाळेच्या सुरक्षित वातावरणातून कॉलेजच्या काहीशा बिनधास्त व स्वतंत्र अशा वातावरणामध्ये जाते तेव्हा प्रत्येक आईला आपल्या मुलीची काळजी वाटत असते. त्यात जर मुलीचे वडील राजकीय क्षेत्रात असतील तर त्याचे पडसाद मुलीच्या जीवनात उमटू नयेत म्हणून आई प्रयत्न करत असते. आजची आघाडीची अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या बाबतीतही असच झालं आहे. जेव्हा संस्कृतीची शाळा () पूर्ण झाली आणि ती कॉलेजला जाणार होती त्या दरम्यान आईने संस्कृतीची अशी काही शाळा घेतली की संस्कृतीने कॉलेजची तीन वर्ष ना कोणा मुलाशी मैत्री केली ना कुठल्या प्रेमाच्या प्रपोजलचा स्वीकार केला. आईने दिलेले ते लेक्चर संस्कृतीने कॉलेजची 3 वर्ष पक्क डोक्यात ठेवलं होतं. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने संस्कृतीने ही गोष्ट तिच्या चाहत्यांपर्यंत पोचवत असताना तिच्या मनातील प्रेमाची व्याख्याही सांगितली.

संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) हे नाव आज जरी अभिनय क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलं तरी संस्कृतीचे वडील हे राजकारणात सक्रिय असल्यामुळे सतत त्यांच्या कुटुंबाकडे एक अट्रॅक्शन म्हणून पाहिलं जायचं. संस्कृती ही मूळची पुण्याची आणि पुणे परिसरात तिच्या वडिलांची राजकीय कारकीर्द आणि लोकप्रियता आहे. वडील राजकारणात असल्यामुळे खूप गोष्टी सोप्या असल्या तरी संस्कृतीशी मैत्री करायला फार कोणी धजावत नव्हतं. अर्थात त्यामागे हेच कारण होतं की तिचे वडील राजकारणात आहेत. तिच्याशी मैत्री करायला नको म्हणत कुणी पुढे येत नसल्यामुळे संस्कृतीला कॉलेज जीवनामध्ये प्रपोज करणं ही तर खूपच लांबची गोष्ट होती. पण संस्कृतीच्या आईने राजकारणापेक्षा कुटुंबातील साधेपणाला खूप महत्त्व दिलं आणि म्हणूनच जेव्हा संस्कृतीची दहावी झाली आणि आता ती अकरावीला कॉलेजमध्ये प्रवेश घेणार होती त्यापूर्वी संस्कृतीला समोर बसवलं आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींपासून लांब राहायचं याचा एक लेक्चर दिलं.

संस्कृती सांगते, मला चांगले आठवते की, अकरावीचे कॉलेज सुरू व्हायला दोन-तीन दिवस बाकी होते आणि आईने मला एकदा स्वयंपाकघरात बोलवलं आणि समोर बसवलं. ती म्हणाली, की कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुला असं वाटेल की आता आपल्याला सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य मिळालं. मी कुठेही जाऊ शकते. मी कितीही वाजता घरी येऊ शकते. तर ते चालणार नाही . आणि दुसरी गोष्ट तिने मला सांगितली की अनेकदा मुलं सुरुवातीला मैत्रीचं कारण देऊन ओळख वाढवतात आणि त्याच्यानंतर अशा गोष्टी प्रेमापर्यंत जातात. पण आता तुझं शिकण्याचं वय आहे. अभ्यास करण्याचं वय आहे. त्यामुळे प्रेमात पडायला माझा विरोध नाही पण आंधळेपणाने प्रेमात पडू नकोस. कोण आपल्याशी कुठल्या उद्देशाने मैत्री करतोय याचा विचार करून तू मैत्रीचा हात पुढे कर. आईने सांगितलेल्या त्या गोष्टीचा माझ्या मनावर एवढा पगडा होता की कॉलेजमधली तीन ते चार वर्ष मी कोणीही मला मैत्री करणार का असं विचारल्यानंतर नॉट इंटरेस्टेड हे एकच उत्तर द्यायचे. एकदा तर मला एका मुलाने असं विचारलं होतं की मला फ्रेंडशिप देशील का ? तेव्हा मला प्रश्न पडला होता की फ्रेंडशिप ही द्यायची किंवा घ्यायची गोष्ट आहे का ? मैत्री आपसूक व्हायला पाहिजे आणि खरच मला आईने दिलेला तो सल्ला उपयोगी पडला. कुठल्याही आंधळेपणाने मी मैत्री किंवा प्रेम केलं नाही. ज्याचा फायदा मला खरच खूप झाला आणि आत्ता माझ्याकडे मैत्रीचं वर्तुळ आहे ते खऱ्या अर्थाने मैत्री असलेलं आहे. ज्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही किंवा कुठलाही दुसरा हेतू नाही. प्रेमाच्या बाबतीतही संस्कृतीचे मत ठाम आहे की तिला असं वाटतं की प्रेमामध्ये कोणत्याही अवास्तव गोष्टी नसाव्यात. त्यामध्ये सहजता असली पाहिजे. तो खरेपणा ज्या भावनेमध्ये आहे तेच प्रेम टिकू शकतं. जिथे पैसा, भेटवस्तू, खूप अपेक्षा येतात तिथे प्रेम ही भावना जास्त वेळ राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात अशी व्यक्ती निवडा जी निस्वार्थपणे तुमच्यावर प्रेम करू शकेल.

पिंजरा या मालिकेतून संस्कृती बालगुडेने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेतील तिची आनंदी ही भूमिका खूप गाजली होती. भूषण प्रधान हा तिचा या मालिकेमध्ये नायक होता. संस्कृतीला नृत्याची खूप आवड आहे. शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षणही घेतलं आहे. शिवाय अनेक ठिकाणी ती नृत्याचे धडे देत असते. संस्कृती ही वेगवेगळे फोटोसेशन आणि किस्से शेअर करत सोशल मीडियावर सक्रिय असते.

संस्कृतीचा ‘धरला माझा हात’ हा म्युझिक व्हिडीओ अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संस्कृती बालगुडेच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ‘सांगतो ऐका’ या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमे रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.संस्कृती ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमात दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER