भारतीय शालेय क्रीडा महासंघावर निलंबनाची कारवाई

School Games Federation of India Suspended
  • *2017 मध्ये अनधिकृत पॅसिफिक स्कूल गेम्समध्ये सहभागाचे प्रकरण
  • * खेळाडूंना वाईट वागणूक दिल्याच्या होत्या तक्रारी
  • * महिला हॉकी संघ राहिला होता अडकून
  • * युवा फूटबॉलपटूचा झाला होता बुडून मृत्यू
  • * खेळाडूंकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये घेतल्याचे उघड

नवी दिल्ली- भारतीय शालेय क्रीडा महासंघ (एसजीएफआय) वर निष्काळजी व्यवस्थापनाचा ठपका ठेवत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने बुधवारी निलंबनाची कारवाई केली आहे. एसाजीएफआय ही देशांतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांची सर्वोच्च संस्था आहे.

डिसेंबर 2017 मध्ये ऑस्ट्रेलियातील ऑडिलेड येथे पॅसिफिक स्कुल गेम्समध्ये सहभागावेळी झालेल्या गोंधळावरुन क्रीडा मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. एकतर या पॅसिफिक स्कुल गेम्सना मान्यता नव्हती आणि दुसरे म्हणजे त्यात सहभागावेळी नितिशा नेगी नावाची 15 वर्षीय फूटबॉलपटू बुडून मृत्यू पावली होती. त्याचवेळी महिला हॉकी संघ बराच काळ ताटकळत राहिला होता.

भारताचे 187 खेळाडूंचे पथक त्या सामन्यांमध्ये सहभागी झाले होते. या सर्वच खेळाडूंनी संघासोबतच्या अधिकारी व व्यवस्थापकांकडून वाईट वागणूक मिळाल्याची तक्रार केली होती. क्रीडा मंत्रालयाने निलंबनाची कारवाई करताना व्यवस्थापनातील या त्रुटींसह इतरही अनियमितता नमूद केल्या आहेत.

ऑक्टोबर 2019 मध्ये क्रीडा मंत्रालयाने एसजीएफआयचे जनसंपर्क अधिकारी गौरव दीक्षित आणि त्यांच्या पत्नी आकांशा थापक यांच्यावराही ठपका ठेवला होता. आकांशा यांचे अनधिकृत व्यक्ती असे वर्णन क्रीडा मंत्रालयाने केले आहे.

यासंदर्भात,एसजीएफआयचे सरचिटणीस राजेश मिश्रा यांनी केलेली अंतर्गत चौकशी असमाधानकारक असल्याचे आणि त्यांचे मंत्रालयाला वेळोवेळी स्पष्टीकरणही समाधानकारक नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.

ऑडिलेड येथील पॅसिफिक स्कुल गेम्सला आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाची मान्यता नव्हती आणि क्रीडा मंत्रालयाचीही मान्यता नव्हती. गंभीर बाब म्हणजे एसजीएफआयने या स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रत्येक खेळाडूकडून अडीच लाख रुपये शुल्क घेतले होते. या सर्वच प्रकरणात एसजीएफआयने क्रीडा संहिता 2011 चा भंग एसजीएफआय ने केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सलग तिसरा विजय, भारत उपांत्य फेरीत