विनाअनुदानित शाळा कृती समितीचा बारावी परीक्षेवरील बहिष्कार मागे

Ratnagiri News

रत्नागिरी /प्रतिनिधी : सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात अनुदानपात्र शाळांसाठी २० टक्के आर्थिक तरतुदीसह अन्य मागण्या मान्य झाल्याने जिल्ह्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी बारावीच्या परीक्षा कामकाजावरील व पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन कोकण मंडळाच्या सहसचिव भा. पा. राजनोर यांना देण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक सर्व शिक्षकांनी अनुदानपात्र शाळांसाठी आर्थिक तरतुदीसह अन्य मागण्यांसाठी इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा कामकाजावर व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता.

मात्र, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वित्तमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत चालू आर्थिक अधिवेशनात अनुदानपात्र शाळांच्या अनुदानासाठी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात पुरवणी यादीमध्ये २० टक्के आर्थिक तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे १०० टक्के निकालाचीही अट शिथिल करण्यात आली आहे. ३० मे २०२० पर्यंत एकही उच्च माध्यमिक वर्ग तुकडी, शाखाही विनाअनुदानित राहणार नाही, अशा मागण्या मान्य झाल्याने रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे.

बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचे निवेदन विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रा. अमोल यादव, प्रा. प्रशांत मेश्राम, प्रा. प्रकाश पालांडे, प्रा. रोहित यादव यांनी शुक्रवारी कोकण मंडळाच्या सहसचिव भा. पा. राजनोर यांना दिले.