वाझेची १४ दिवसांसाठी तळोजा कारागृहात रवानगी, सुरक्षित सेल देण्याची मागणी

Sachin Waze

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात तब्बल २७ दिवस एनआयएच्या कोठडीत असलेले निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला (Sachin Waze) थोडा दिलासा मिळाला आहे. वाझेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. २३ एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालीयन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष एनआयए  (NIA) कोर्टाने दिले.

दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाझेच्या वकिलाने वाझेसाठी तुरुंगात सुरक्षित सेल देण्याची मागणी केली आहे. सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा सेल देण्यात यावा, असं वाझेच्या वकिलाने म्हटलं आहे. तर, वाझेची तळोजा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

सीबीआयने कोर्टात आज एक अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी वाझे आणि विनायक शिंदे यांची डायरी आणि इतर कागदपत्रं आदी पुराव्यांचा तपास करायचा असून या तपासाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने ही विनंती मान्य केली आहे. सीबीआयला ज्या काही दस्ताऐवजांची गरज आहे, ती देण्यात यावीत, असे आदेश कोर्टाने एनआयएला दिले आहेत.

दरम्यान, वाझेंचं पत्रं मीडियात लीक झाल्याबद्दल एनआयएने जोरदार आक्षेप नोंदवला. वाझे कोठडीत असताना त्यांचं पत्रं बाहेर आलं कसं? असा प्रश्न एनआयएने केला. त्याबाबत कोर्टाने वाझेंच्या वकिलांना विचारणा केली असता मला यातलं काहीच माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं. पत्र कसं बाहेर आलं हे मला माहीत नाही. या प्रकरणात मी सहभागी नाही, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं. असा प्रकार पुन्हा घडता कामा नये, अशी सक्त ताकीद न्यायाधीशांनी दिली. वाझेंच्या आरोग्याविषयीची माहितीही कोर्टाकडून विचारली गेली. त्यावर वाझे एकदम फिट आहेत. त्यांना सध्या उपचाराची गरज नाही, असं एनआयएकडून सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button