
दिल्ली : केरळच्या प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोरच्या राजघराण्याकडेच राहील, असा महत्त्वाचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. याबाबतचा केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे.
श्री पद्मनाभ स्वामी मंदिर काही वर्षांपूर्वी मंदिराजवळील अफाट संपत्तीमुळे चर्चेत आले होते. मंदिराजवळ दोन लाख कोटीची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.
केरळ उच्च न्यायालयाने २०११ साली श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आणि त्याच्या संपत्तीवर राज्य सरकारचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला त्रावणकोरच्या राजघराण्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयात या खटल्यावर आठ वर्ष सुनावणी चालली. एप्रिल महिन्यात न्यायाधीश ललित आणि न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने निकाल सुरक्षित ठेवला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्रावणकोरच्या राजघराण्याकडे कायम राहणार आहे. तूर्तास तिरुअनंतपूरममधील जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यतेखालील समितीकडे मंदिराचे व्यवस्थापन राहणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
त्रावणकोरच्या राजघराण्याने १८ व्या शतकात श्री पद्मनाभ स्वामी मंदिराचे पूननिर्माण केले होते. १९४७ च्या आधी या राजघराण्याचे दक्षिण केरळ आणि शेजारच्या तामिळनाडूच्या काही भागांवर शासन होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन राजकुटुंबाचे नियंत्रण असलेल्या ट्रस्ट मार्फत सुरू होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला