आता महिलाही होऊ शकेल नौदलप्रमुख!

Women Navy

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी मोठा निर्णय दिला. भारतीय नौदलात कार्यरत महिला अधिकार्‍यांना पदमर्यादेचे बंधन ठेवता येणार नाही. त्या नौकायनामध्ये पुरुष अधिकाऱ्यांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नसून, त्यांना नोकरीत ‘परमनंट कमिशन’ देण्यात यावे, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिला. या आदेशामुळे आता, नौदलात कार्यरत महिला अधिकारी सर्वोच्च पदापर्यंत वाटचाल करू शकतील.

अधिवेशन ३ एप्रिलपर्यंत चालेल : पंतप्रधान मोदी, ‘त्या’ पत्रावर नाराजी

आतापर्यंत नौदलातील महिलांना विशिष्ट स्तरापर्यंतच अधिकारक्षेत्र मर्यादित होते, हे येथे उल्लेखनीय. या मर्यादेस न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. नुकतेच लष्करानेही महिलांना ‘परमनंट कमिशन’ देण्याचा आदेश दिलेला आहे, हे विशेष.

न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने आजचा हा ऐतिहासिक निर्णय दिला. केंद्र सरकारला तीन महिन्यांत या आदेशाचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

नौदलातील महिला आणि पुरुष अधिकार्‍यांना समान दर्जाची वागणूक देणे गरजेचे आहे. शारीरिक कारणांवरून त्यांच्यात भेदभाव करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायलयाने आपल्या आजच्या आदेशात म्हटले आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानेही महिला अधिकार्‍यांच्या बाजूने निर्णय दिला होता; मात्र, संरक्षण खात्याने या निर्णयास आव्हान दिले होते.