पाटीदार नेते हार्दीक पटेल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Hardik Patel

अहमदाबाद : गुजरातमधील 2015 सालच्या पाटीदार आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते हार्दीक पटेल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने 6 मार्चपर्यंतचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पटेल यांनी आपल्याविरुद्धचे हे प्रकरण रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली होती. यानंतर न्यायमूर्ती यु. यु. ललित आणि विनित सरन यांनी गुजरात सरकारला तसे आदेश दिले आहे. 2015 साली दाखल या प्रकरणाचा तपास अद्यापही प्रलंबित आहे. तुम्ही पाच वर्षे कुठल्याही प्रकरणाची वाट बघू शकत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

सरकारी नोक-यांत पाटीदार समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या बॅनरखाली पटेल यांनी अहमदाबाद येथे महारॅली केली होती. यादरम्यान त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीररित्या मंडळी जमवण्याबाबत प्राथमिकी दाखल करण्यात आली होती. याची रितसर परवानगी घेतली गेली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.