सायली चढणार ऑनलाइन बोहल्यावर

Saylee

आजकाल प्रत्येक गोष्ट ऑनलाइन झालीय. नेलपॉलिश, हेअरकलर,  भाजीपाला, किराणा, फर्निचर अशी ऑनलाइन खरेदीची यादी बरीच मोठी आहे बरं का. फोटो बघायचे आणि ऑर्डर प्लेस केली की फक्त दारावरची बेल वाजण्याची वाट बघायची की झालं खरेदीचं काम. हुश्श… किती सोप्पं आहे ना. आता शॉपिंगप्रमाणे लग्नंही ऑनलाइन जुळवली जाताहेत. डॉट कॉम हा शब्द आता यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी परवलीचा झाला आहे. आमचं ना..मॅट्रीमोनी साइटवर जुळलं असं सांगणाऱ्यांची संख्या वाढतेय हो. शिवाय महिन्याला लाखाच्या घरात सॅलरी घेणाऱ्यांना कुठेय आहेय तो कांदापोहे खाण्यासाठी मुलीच्या खरी जायला वेळ… मग काय? मग बघण्याचा कार्यक्रमही ऑनलाइनच. सध्याच्या याच ट्रेंडवर येणाऱ्या मालिकेत सायली संजीव ही ऑनलाइन बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाली आहे.

आमच्या मुलीसाठी जरा माहितीत कुठे चांगला मुलगा असेल तर बघा हो… किंवा, यंदा मुलाच्या लग्नाचा विचार आहे, कुणी मुलगी असेल पाहण्यात तर सुचवा इथंपासून लग्न जुळवण्याची पद्धत आता लॉगइन करा आमच्या साइटवर आणि मनासारखा जोडीदार मिळवा इथंपर्यंत येऊन पोहोचली आहे. अर्थात ही बदलत्या काळाची पावले आहेत आणि ती बरोबरही आहेत. सध्या अनेक मालिकांचे विषय पाहिले तर वास्तवातील एखाद्या धाग्याशी जुळलेले असतात. प्रेक्षकांनाही आता काल्पनिक काही नकोसं झालं असावं कारण मालिका पाहताना ती आपल्या अवतीभवतीची गोष्ट वाटावी आणि प्रेक्षकांनी स्वताला रिलेट करावं ही अपेक्षा असणारच. त्यामुळेच सध्या चर्चेत असलेला ऑनलाइन लग्न जुळवण्याचा ट्रेंड मालिकेतून मांडला जाणार आहे. शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत ऑनलाइन बघण्याचा कार्यक्रम, मुलामुलींचं एकमेकांशी बिनधास्त बोलणं, काय हवं आणि काय नको हे थेट सांगण्याचा मोकळेपणा यावर ही मालिका बेतलेली आहे. मधल्या काळात मोठ्या पडद्याकडे वळलेली सायली संजीव ही या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा छोट्या पडद्यावर येतेय.

काहे दिया परदेस या मालिकेत गौरी या भूमिकेतून सायली संजीव हिने टीव्ही क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर तिने पैठणीवर आधारीत एक वेबसिरीजही केली. पोलिस लाइन एक पूर्ण सत्य, परफेक्ट पती, सातारचा सलमान या सिनेमातून दिसलेली सायली घराघरात आवडली ती काहे दिया परदेशमुळेच. अश्शीच सून असावी असा अनेक तरूण मुलांच्या समस्त मम्मांनी गौरी या पात्राला वाखाणलं. मराठी मुलगी आणि बिहारी मुलगा यांचे लग्न असाच या मालिकेचा गाभा होता. त्यानंतर गेल्या वर्षी मन फकीरा या सिनेमातही सायली सुव्रत जोशीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. लग्नानंतर जेव्हा एकमेकांच्या अफेअर्सचा भूतकाळ सांगितला जातो तेव्हा त्याकडे आजचे कपल कसे पाहते अशी या सिनेमाची वन लाइन स्टोरी होती. वेगवेगळ्या परिस्थितीत लग्न या विषयावर सायलीने यापूर्वी अभिनय केला आहे आणि आता शुभमंगल ऑनलाइन या सारख्या आजच्या जगातील तरूणाईच्या लग्नाचा सोहळा मांडण्यासाठी सायली देखील खूप उत्सुक आहे.

मुळची धुळ्याची पण नाशिकमध्ये शिक्षण झालेल्या सायलीने भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचे रितसर शिक्षण घेतले आहे. लंगडा मोर या एकपात्री अभिनयात कॉलेजमध्ये असताना सायलीने मिळवलेले बेस्ट अॅक्ट्रेस हे पारितोषिक तिला या क्षेत्राकडे घेऊन आले. कॉलेजमध्ये असताना सायलीने सहज म्हणून एक जाहीरात केली आणि त्यातील तिचा सहज वावर पाहून तिला मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. अभिनयातील करिअरसाठीच नाशिकमधून ती मुंबईत आली आणि तिचा अभिनयातील प्रवास सुरू झाला.  आठवते का तुला या अल्बममध्ये सायलीवर एक गाणंही चित्रीत झालं होतं. रोज नियमित योगा आणि व्यायामासाठी वेळ राखून ठेवणारी सायली फिटनेसच्या बाबतीत आग्रही आहेच पण तिला कुत्रे खूप आवडतात. घरातही तिचा पपी आहे आणि कामातून कितीही दमून आली की त्याच्यासोबत खेळल्यानंतर तिचा कंटाळा कुठच्याकुठे पळून जातो. कुत्रे म्हणजे तिची एनर्जी आहे.

नव्या मालिकेसाठी सायलीने तिच्या काही सिंगल मैत्रिणींशी बोलून सध्याच्या मुली लग्नाबाबत काय विचार करतात हे जाणून घेतलंय. शिवाय सायलीही अजून सिंगल आहे त्यामुळे या मालिकेतील तिच्या भूमिकेचा तिला तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार शोधण्यासाठीही मदत होईल असं तिच्या चाहत्यांना मनापासून वाटतय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER