कण्टकारी म्हणा वा रिंगणी कास श्वास कमी करी !

जमिनीवर पसरणारे काटेरी हे झाड व पानांवर लहान पिवळे काटे असणारे हे क्षुप अनेकांनी बघितले असेल. याची फळे – गोल, कच्चे असतांना हिरवे व पिकल्यावर पिवळे फळ जे लहान वांग्याप्रमाणे दिसतात. फुलं निळ्या रंगाची असतात. रिंगणी ला कंटकारी ( काटे असलेले) दुः स्पर्शा, व्याघ्री ( व्याघ्राप्रमाणे स्वर करणारी) निदिग्धिका ( शीघ्र वाढणारी) अशी विविध नावे आहेत.

कंटकारी कफ वातदोषावर कार्य करते. सूज कमी करणारी, सर्दी, नाक चोंदणे यावर कंटकारी सिद्ध तेल नस्याकरीता वापरतात. पटकन नाक मोकळे होते. श्वास घ्यायला त्रास होत नाही. कण्ठ भागात कफ जमा झाल्याप्रमाणे वाटत असेल तर कंटकारी उपयोगी ठरते.

प्राणवह स्रोतसावर कंटकारी खूप फायदेशीर आहे. दमा, कास, प्रतिश्याय यावर कंटकारी असलेले औषध उपयोगी आहे.
शरीरावर सूज असणे, रक्तभारवृद्धी यामधे कंटकारी वापरल्या जाते. मूत्रल असल्यामुळे मूत्रविकार, शरीरात पाण्याचे प्रमाण वाढणे यावर कंटकारी कार्य करते.

थंडी वाजून ताप येत असेल सर्दी खोकला अंग दुखणे अशी लक्षणे असेल तर कंटकारी काढा गुडूची सुंठी सह उपयोगी ठरतो. दात किडल्यास रिंगणीची फळे वापरली जातात.

कंटकारीपासून अनेक औषधे बनविली जातात. दशमूळाचा एक घटक कंटकारीमूळ आहे. च्यवनप्राश जे उत्तम रसायन आहे त्यात कंटकारी मूळ वापरले जाते. व्याघ्री तेल, कंटकार्यावलेह, कंटकारी घृत, दशमूलारिष्ट अशा अनेक औषधांमधे कंटकारी एक मुख्य घटक आहे. अशी ही कंटकारी वाघाप्रमाणे आवाज मोकळा करणारी व्याघ्री अनेक विकारांवर अत्यंत उपयोगी आहे.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER