स्वांत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवणार

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा निर्धार

Savarkar - Chandrakant Patil

देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारी विचार उपयोगी पडले हे जगमान्य आहे. स्वातंत्र्यवीरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आता काम करणार, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी नाकारला. त्यावर प्रतिक्रीया देताना श्री पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरही सडकून टीका केली.

श्री पाटील म्हणाले की, महात्मा गांधींप्रमाणेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकारी विचार उपयोगी पडले हे जगमान्य आहे. स्वातंत्र्यवीरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी गौरव प्रस्ताव मांडला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी तो नाकारला, सत्तेसाठी लाचार झालेली शिवसेना याकडे बघ्याच्या भूमिकेतून पाहात होती.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस नेते मणिशंकर आय्यर यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन केलं. पण आज त्यांचेच पुत्र श्री उद्धवजी ठाकरे हे सत्तेसाठी काँग्रेसी नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. स्वातंत्र्यवीरांबद्दल काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकात अतिशय बिभत्सपणे टिप्पणी केली जाते, आणि सत्तेसाठी लाचर झालेले शिवसेना नेतृत्व यावर मौन बाळगून आहे.

स्वातंत्र्यवीरांचा आपमान भारतीय जनता पक्ष कधीही सहन करणार नसल्याचे सांगून श्री पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकारी विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा यथोचित गौरव झालाच पाहिजे ही आमची नेहमीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे सावरकरांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जनतेत जाणार असल्याचा निर्धार श्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.