सावरकर, अमिताभ…. कविता आणि बरंच काही….

Amitabh Bacchan & Swatantra Veer Sawarkar

साहित्याचे मानवी जीवनात काय स्थान असते…साहित्यामुळं मनाची मशागत होते. माणूस उन्नत होतो. प्रतिकूल परिस्थितीत असताना ग्रंथवाचनानं किंवा साहित्यानं उभारी दिली, असे अनुभव अनेक लोकोत्तर व्यक्तींनी नेंदवून ठेवलेत. तुरुंगाच्या भिंतींमधे काळकोठडीत कागद पेन नसताना भिंतीवर कविता लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर काय किंवा रस्त्यानं जाताना सुचलेलं काव्य एखाद्या चिठोऱ्यावर लिहिणारे अनेक मोठे कवी, गीतकार काय, या सर्वांनी हे अनुभवलेलं असतं की आलेला क्षण निघून जातो, तो पुन्हा येत नाही तसंच सुचलेलं काव्य कागदावर लिहून ठेवलं नाही तर हरवून जातं. मनाला अस्वस्थता देतं.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे ताज्या दोन बातम्या. एका बातमीनुसार बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ब्लॉग लिहून आपली अस्वस्थता व्यक्त केलीय. ते लिहितात, करोनामुळं (Corona) मला कुटुंबियांपासून लांब रहावं लागतंय. कुणीही भेटत नाही. डॉक्टरदेखील तपासून जातात ते पीपीई किट घालून. त्यामुळं ते यंत्रमानवासारखेच वाटतात कारण त्यांचा चेहरा दिसत नाही. मी झोपायचा प्रयत्न करतो पण झोप येत नाही. मी घाबरतो. मला बाबूजींचा म्हणजे वडिलांची आठवण येते. मी त्यांची कविता वाचतो आणि मला बरं वाटतं.

करोनामुळं रुग्णालयात असलेल्या अमिताभची ही अवस्था होतेय तर सामान्यांचं काय होत असेल…पण साहित्यवाचन, कविता मनाला उभारी देते, हेही महत्त्वाचं. पण मनाला उभारी देणाऱ्या समाजाला उभं करणाऱ्या आणि प्रसंगी आडवंही करायची ताकद असलेल्या साहित्याकडे, साहित्यिक संस्थांकडे सरकारचं दुर्लक्ष का, असाही प्रश्न मनात आला. त्याला कारण दुसरी बातमी.

पुरोगामी राज्य असलेलं महाराष्ट्र साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट, नाटक, सिनेमा या सर्वच बाबतीत प्रगत, उन्नत आहे. कवी गीतकार चित्रपट निर्माते, दिग्दर्शक गुलजार यांनीही लहान मुलांचं वाङमय, कविता गाणी महाराष्ट्रात मराठीत होतात, तशी फार कमी प्रांतांमधे होतात, हे निरीक्षण पूर्वी नोंदवलं होतं. पण ताज्या बातमीनुसार नवीन सरकार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचं साहेब संचलित, स्टिअर्ड बाय अजितदादा आणि मूकसंमतीचं कॉँग्रेस असं त्रिकूट फेम सरकार सत्तेत आल्यानंतर साहित्यव्यवहाराशी, साहित्यविश्वाशी संबंधित महत्त्वाच्या चारही समित्यांवरच्या नेमणुका सरकारी भाषेत अद्यापही प्रलंबित आहेत.

एक तर नवं सरकार आलं की जुन्या सरकारमधले विविध ठिकाणी नेमलेले मर्जीतले लोक काढून टाकायचे, हे सर्वात पहिलं काम असतं. प्रस्तुत समित्यांवर सगळेच मर्जीतले वगैरे नव्हते पण ते माणसं काढून टाकायचं काम झालं पण नव्या नेमणुका काही झाल्या नाहीत. विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, भाषा सल्लागार समिती आणि ग्रंथनिवड समिती अशा चार महत्त्वाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.

करोना स्थिती गंभीर आहे, हे बरोबर आहे पण इतक्या गंभीर स्थितीतही साहित्य काय ताकद देतं, हे वरच्या उदाहरणांवरून सहज लक्षात यावं. पण मुळात या समित्या म्हणजे कंत्राटं मिळण्याची कुरणं नाहीत आणि साहित्य या शब्दाचा संबंध उपकरण या अर्थानं ज्यांच्याशी येतो, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करावी…

अर्थात, सरकार म्हणजे अमूर्त गोष्ट नाही. लोकशाहीत ते लोकांचं, लोकांसाठी लोकांनी चालवलेलं असतं. मग प्रश्न असा येतो की साहित्यविश्वातल्या लोकांनी अधिकृत पत्रंलेखन वगैरे करतानाच सोशल मिडियावर सक्रीय होऊन यासाठी मोहीम का करू नये…

भिंतीवर महाकाव्य लिहून ते मुखोद्गत करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर (Swatantryaveer Vinayak Damodar) सावरकर या महाकविपासून प्रेरणा घेण्याची आज गरज आहे. त्यांनी भिंतीवर लिहिलं तसं साऱ्या सरस्वतीपुत्रांनी आपापल्या हातातल्या मोबाइलची बटणं आपल्याच बोटानं दाबून एखादी मोहीम सुरू करावी. अर्थात त्यात आजचे साहित्यिक, लेखक, कवी, साहित्य व्यवहारातले साहित्यलिश्वातले सारेच येतील आणि ही मोहीम सुरू करतील. त्यातून अक्षर वाङमयाचा प्रभावी भाषेचा प्रभावी वापर करून सरकारला नेमणुकांची छोटीशी कृती करायला बाध्य करतील, ही अपेक्षा करू या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER