सौरव गांगुलीची स्पष्टोक्ती, आयपीएलचे पुढचे सामने भारतात होणे कठीणच!

Saurav Ganguly says difficult to say about IPL

कोरोना लाटेमुळे (Corona wave). अर्धवट थांबविण्यात आलेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) चे पुढचे सामने कधी व कुठे होतील हे सांगणे अवघड आहे पण उर्वरीत सामने भारतात होणार नाहीत एवढी बाब भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केली आहे. आयपीएल खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना बाधा झाली नसती तर आम्ही आयपीएल सुरू ठेवले असते आणि पूर्णही केले असते असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाने मंडळासमोर गेल्या वर्षापासून आव्हानेच आव्हाने उभी केली आहेत. डिसेंबर 2020 ते यंदा मार्च एवढाच काळ जरा बरा गेला. पण इतर काळात कोरोनाशी लढाई कायम आहे. हा फार कठीण काळ आहे आणि क्रिकेटपटूसुध्दा त्यात भरडले गेले आहेत असे गांगुली यांनी म्हटले आहे.

दुबईत आयपीएलचे आयोजन हे एक आव्हानच होते. ते आम्ही पेलले पण दुसऱ्या लाटेने अडचणी प्रचंड वाढवल्या. अशा काळात क्रिकेट सुनियोजीत ठेवणे फारच कठीण आहे. पाच महिन्यात विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करायचे आहे पण जोवर ही महामारी आहे तोवर प्रत्येक गोष्ट एक आव्हानच आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात काही स्पर्धा घेता आल्या. ज्युनियर क्रिकेटच्या स्पर्धाही जुलैमध्ये घेणार होतो पण आता ते शक्य नाही, महिलांचे आयपीएलही त्यामुळेच रद्द करावे लागले असे गांगुली यांनी स्पष्ट केले.

आमच्या महिला आठ वर्षानंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहेत. इंग्लंड दौऱ्यावर त्यांना भरपूर सामने खेळायचे आहेत. वेस्ट इंडिजचा संघ भारतात येणार आहे. हंड्रेड’मध्ये आपल्या पाच खेळाडू भाग घेणार आहेत. त्यानंतर न्यूझीलंड दौरा आणि विश्वचषक स्पर्धा आहे. एवढे नियोजन असूनही महिला क्रिकेटला आम्ही प्रोत्साहन देत नाहीत असा लोकांचा समज असेल तर आपण काहीच करू शकत नाही.

आयपीएल 2021 आधीच थांबवायला हवे होते या चर्चेबद्दल गांगुली म्हणाले की, सुरुवातीला मुंबई व चेन्नईत सामने झाले तेंव्हा परिस्थिती एवढी खराब नव्हती. नंतर स्थिती बिघडली, इंग्लिश प्रिमियर लीगमध्येही अडचणी आल्या होत्या. त्यांनी सामन्याचे वेळापत्रक बदलले पण आयपीएलसाठी ते शक्य नव्हते. खेळाडू घरी गेले की क्वारंटाईन वगैरे सर्व प्रक्रिया नव्याने सुरू होणार होती. जर खेळाडू बाधित झाले नसते तर आयपीएल सुरू राहिले असते आणि कदाचित पूर्णसुध्दा झाले असते. खेळाडू बबलमध्ये होते. मैदानात प्रेक्षक नव्हते. खेळाडूंना बाधा नव्हती तोवर ठीक होते पण खेळाडू बाधीत दिसताच आम्ही सामने थांबवले. जगातील काही लीग्जनी तर खेळाडू पॉझिटिव्ह आल्यावरसुध्दा सामने सुरू ठेवले याकडे मंडळाच्या अध्यक्षांनी लक्ष वेधले.

टेस्ट चॕम्पियनशीपची फायनल 22 जूनला आटोपल्यावर किंवा इंग्लंड दौऱ्यातील सामने आटोपल्यावर इंग्लंडमध्ये आयपीएलचे पुढचे सामने घेण्याची शक्यता फेटाळताना गांगुली म्हणाले की, तसे होणे अवघडच आहे कारण भारतीय संघ तीन कसोटी व पाच वन डे सामन्यांसाठी श्रीलंकेत जाणार आहे.14 दिवस क्वारंटाईन अशा अनेक अडचणी आहेत. त्यामुळे भारतात पुढचे सामने होणे अवघडच आहे. आयपीएलसाठी कोणती वेळ योग्य राहिल हे आताच सांगणे अवघड आहे. बबलमध्ये राहणे सोपेनाही. पण बबलशिवाय क्रिकेट खेळणेही शक्य नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button