सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

Sourav Ganguly

बीसीसीआयकडून लोढा समितीच्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात ,पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत जुन्याच घटनेनुसार घेतले निर्णय


मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. अर्थात यासाठी सर्वोच्च न्यायालयाची संमती घ्यावी लागणार आहे.

लोढा समितीच्या शिफारशीनुसार सौरव गांगुली यांना अध्यक्षपदासाठी केवळ नऊ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार होता. गांगुली यांनी २३ आॅक्टोबर रोजी मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला आणि त्यांना पुढील वर्षी हे पद सोडावे लागणार होते परंतु आता नवीन मंजूर सुधारणांनुसार ते २०२४ पर्यंत अध्यक्षपदी राहू शकतात.

बीसीसीआयच्या उच्चपदस्थ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार प्रस्तावीत सर्व सुधारणा किंवा दुरुस्त्यांना विशेष सभेत मंजुरी देण्यात आली असून त्या सर्वोच्च न्यायालयाकडे संमतीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

बीसीसीआयच्या सध्याच्या घटनेनुसार एखाद्या पदाधिकाºयाने बीसीसीआय किंवा राज्य संघटनेत दोन वेळा तीन वर्ष पद सांभाळले असेल तर त्यांना पुढील तीन वर्षे कोणतेही पद स्विकारता येत नाहीे.