जाणून घ्या सौराष्ट्राचा चिराग जानी का आहे भारताचा सॕम करन?

इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा भारत दौरा संपला असला तरी शेवटच्या सामन्यातील सॕम करनची (Sam Curran) आठव्या क्रमांकावर खेळताना 83 चेंडूतील 95 धावांची खेळी अजुनही स्मरणात आहे. दीर्घकाळ स्मरणात राहील अशीच ही खेळी होती.

मर्यादित षटकांच्या वन डे सामन्यात 330 धावांच्या पाठलागात निम्मी षटके होतानाच 6 बाद 168 अशा स्थितीत इंग्लंड हा सामना लवकरच गमावेल असे मानले जात होते. जेसन राॕय, बेयरस्टो, बेन स्टोक्स, बटलर, डेव्हीड मालन असे खंदे फलंदाज परतलेले होते. अशा वेळी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सॕमच्या त्या खेळीमुळेच तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता आणि एकावेळी त्याने इंग्लंडच्या (England) विजयाच्या शक्यताही निर्माण केल्या होत्या. केवळ सात धावांनी इंग्लंडने तो सामना गमावला होता. या खेळीमुळेच इंग्लंडने सामना गमावला तरी सॕम करन सामनावीर ठरला होता.

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे सॕम करनच्या या झुंझार व संस्मरणीय खेळीसारखीच, किंबहुना त्यापेक्षा संघर्षमय खेळी 2012 मध्ये सौराष्ट्राच्या (Saurashtra) चिराग जानी (Chirag Jani) नावाच्या खेळाडूने केली होती. विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) पश्चिम विभाग स्पर्धेचा तो सौराष्ट्र विरुध्द महाराष्ट्र असा सामना होता. दुर्देवाने सॕम करनप्रमाणेच त्या सामन्यातही चिराग जानीची झुंज अपयशी ठरली होती. सौराष्ट्राने फक्त 2 धावांनी तो सामना गमावला होता.

विशेष म्हणजे चिरागचा तो पदार्पणाचाच सामना होता आणि त्यात सॕमप्रमाणेच आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्यावर तो शेवटी 98 धावांवर नाबाद परतला होता. हे पाहता सॕम करनने चिरागच्या झुंझार खेळीची पुनरावृत्ती केली असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.

त्या सामन्यात सौराष्ट्राला 311 धावांचे लक्ष्य होते. त्याचा पाठलाग करताना सलामीवीर सागर जोगियानी याने 101 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केल्यावरही 32 षटकात सौराष्ट्राची 6 बाद 176 अशी अवस्था झाली होती. अशावेळी सॕम करनप्रमाणेच चिराग आठव्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात उतरला होता. मात्र 311 चे लक्ष्य असताना 9 बाद 232 अशी सौराष्ट्राची अवस्था झालेली होती. अशा वेळी चिराग जानी याने शेवटचा फलंदाज सिध्दार्थ त्रिवेदी (नाबाद 4)याला सोबत घेत जो जिगरबाज खेळ केला त्याला तोड नाही.

चिरागने जोरदार प्रतिहल्ला चढवत 10 चौकार व सहा षटकार लगावत सामन्याचा नूरच पालटला. त्यामुळे शेवटचा गडी मैदानात उतरला तेंव्हा साडेसात षटकात 79 धावा असे असलेले समीकरण दोन षटकात 31 धावा असे बदलले. 49 व्या षटकात संग्राम अतीतकरच्या गोलंदाजीवर त्याने दोन चौकार व दोन षटकारांसह 21 धावा वसूल केल्या आणि 311 चा पाठलाग करताना 6 बाद 176 अशा स्थितीतून सौराष्ट्राच्या संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात 10 धावा हव्यात अशी स्थिती बनली. या षटकात पहिल्या पाच चेंडूंवर मोहसीन सैयदने फक्त तीन धावा दिल्या. सामना टाय करण्यासाठी अखेरच्या चेंडूवर षटकार आवश्यक होता. पण चिराग जानी केवळ चौकारच लगावू शकला. यामुळे सौराष्ट्राचा विजय आणि चिराग जानीचे शतक, दोन्ही गोष्टी फक्त दोनच धावांनी दूर राहिल्या.

सौराष्ट्राने सामना गमावला पण चिरागच्या या पहिल्याच सामन्यातील झुंझार खेळीने तो नेहमीसाठी स्मरणात राहिला. फलंदाजीत मन जिंकण्याआधी त्याने गोलंदाज म्हणूनही दोन बळी घेतले होते.

त्यावेळी सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना चिराग म्हणाला होता, “मला विश्वास होता की शेवटपर्यंत टिकून राहिलो तरआम्हाला संधी आहे कारण फल्लाच्या दुखापतीमुळे महाराष्ट्राकडेएका गोलंदाजाची कमी होती. शेवटच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेण्याचा आपला निर्णय चुकीचा होता. मी दोन धावांच्या प्रयत्नात होतो पण ते शक्य झाले नाही.त्या दोन धावा झाल्या असत्या तर निकाल कदाचित वेगळा राहिला असता.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button