
बेळगाव : सौंदत्ती डोंगरावरील यल्लमा मंदिर (Shree Renuka Yellamma Devi Temple) 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्याने मार्गशीर्ष महिन्यात ३० डिसेंबर रोजी होणारी माही पौर्णिमा यात्रा प्रथमच रद्द झाली आहे. त्यामुळे विविध भागातील भाविकांना आता नव्या वर्षापर्यंत देवीच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून मंदिर बंद असून डिसेंबर महिन्यातही मंदिराचे दरवाजे बंदच राहणार आहेत. मार्गशीर्ष यात्रेनंतर महिनाभर मंदिर बंद ठेवण्यात येते. सौंदत्ती यल्लमा मंदिरात कोरोनाचा (Coronavirus) संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. जी. हिरेमठ यांनी संपूर्ण डिसेंबर महिन्यात मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे यंदा जग व सासनकाठ्या सौंदत्ती डोंगरावर येणार नाहीत. डिसेंबर महिन्यातील पौर्णिमा यात्रेला पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविक येत असतात.
कर्नाटकातील अनेक मंदिरे सुरू झाली असताना जिल्ह्यातील यल्लमा मंदिर व मायक्का चिंचली मंदिर बंद ठेवले आहे. लाखो भाविकांची गर्दी झाल्यानंतर कोरोनाचा धोका अधिक असल्याने मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. सौंदती यल्लमा देवीचा कंकणविधी व मंगळसूत्र विसर्जन विधी मंदिर व्यवस्थापनाच्या उपस्थितीत साधेपणाने होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला