राममंदिराचा लढा भाग – ३ : सौगंध राम की खाते है…

सौगंध राम की खाते है... राममंदिराचा लढा भाग - ३

एव्हाना रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सौगंध राम की खाते है… हम मंदिर वही बनाएंगे असा निर्धार दिल्लीपासून गल्लीपर्यंत व्यक्त होत होता. तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायसिंह यादव (Mulayasingh Yadav) यांनी जाहीर केले की ३० आॅक्टोबरला अयोध्येत कारसेवा होऊ दिली जाणार नाही.

अयोध्येकडे (Ayodhya) जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले तसेच रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या. श्री रामजन्मभूमीला पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी अक्षरश: घेरले. मुलायसिंह अहंकाराने म्हणाले,  हमारी इजाजत के बिना अयोध्या में कारसेवक तो क्या, परिंदा भी पर नहीं मार सकेगा।तब्बल १ लाख ८० हजार जवान तैनात करण्यात आले. उत्तर प्रदेशला लागून असलेल्या मध्य प्रदेश (MP), राजस्थानसारख्या(Rajasthan) राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी दहा-दहा फुटाचे खड्डे खणण्यात आले. इटावामध्ये चंबल नदीच्या पुलावर दहा फुट उंच आणि तीन फूट रुंद सिमेंटची भिंत बांधली गेली. अनेक ठिकाणी लोखंडी रेलिंग लावून त्यात वीजप्रवाह सोडण्यात आला.

राम मंदिर (Ram Mandir) आंदोलनाचा विषय जगभर पोहोचला होता आणि तो कव्हर करण्यासाठी देशविदेशातून शेकडो पत्रकार आलेले होते. मुलायम सरकारने एवढा तगडा बंदोबस्त केलाय म्हटल्यानंतर आता अयोध्येत मुंगीही शिरू शकणार नाही असेच मीडियाला वाटत होते.

त्यातच अशोक सिंघल (Ashok Singhal) यांनी अज्ञात स्थळावरून घोषणा केली की ३० आॅक्टोबर १९९० ला दुपारी १२.३० वाजता अयोध्येत कारसेवा होणारच. कोणाचाही त्यावर विश्वास बसेना. देवोत्थान एकादशीच्या त्या दिवशी अयोध्येत संचारबंदी होती. दिसताच गोळी मारण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले होते. सशस्र जवानांशिवाय रस्त्यांवर कोणीही दिसत नव्हते. सकाळी ९ वाजता अचानक मणिरामदास छावनीचे दरवाजे उघडले आणि पूज्य वामदेवजी आणि महंत नृत्यगोपाल दास बाहेर आले. त्याचवेळी वाल्मिकी मंदिराचा दरवाजा उघडला गेला आणि विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री अशोक सिंघल प्रकट झाले. त्यांच्या बरोबर होेते, उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महानिरिक्षक श्रीशचंद्र दीक्षित. त्यांना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अयोध्येतील कोपरा न् कोपरा या सगळ्यांना शोधण्यासाठी पोलीस, सुरक्षा जवानांनी जंग जंग पछाडले होते.

पत्रकारांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हे चारदोन नेते रामजन्मभूमीच्या जागी गेले तरी काय करू शकतील? इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या सुरक्षा रक्षकांसमोर त्यांचा काय टिकाव लागणार? मात्र खरा रोमांच बाकी होता. या नेत्यांनी केलेला जय श्रीरामचा जयघोष अयोध्येचा आसमंतात घुमताच घराघरातून आबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने निघू लागले. काही मिनिटांमध्येच भगवे दुपट्टे बांधलेले हजारो स्री-पुरुषाचा समूह पुढे सरकू लागला. संतमंडळी सर्वात पुढे होती नंतर महिला मग मुले आणि शेवटी पुरुष. नि:शस्र पण निडर असे हे रामभक्त श्रीरामाचा जयघोष करीत होते. प्रशासन हतबल झाले. ‘परिंदा भी पैर नही मार सकता’ अशी दर्पोक्ती करणाºया लोकांचे होश उडाले.

कारसेवक हजारोच्या संख्येने हनुमान गढीच्या जवळ पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. अशोक सिंघल यांच्या मस्तकावर काठीचा प्रहार झाला, रक्ताची चिळकांडी निघाली. त्याचवेळी माजी आयपीएस अधिकारी असलेले ६४ वर्षांचे श्रीशचंद्र दीक्षित यांनी वादग्रस्त वास्तूला लागून उभारलेली आठ फूट उंचीची भिंत ओलांडली आणि ते रामलल्लांच्या समोर उभे राहिले. कोणाचा विश्वासच बसत नव्हता. शेकडो कारसेवक समोरच्या पटांगणात जमले. कोलकाताहून आलेले रामकुमार आणि शरद  हे कोठारी बंधू यांनी मशिदीच्या घुमटावर चढून भगवा झेंडा फडकविला. तेव्हा एकच जल्लोष झाला.

अयोध्येतील घडामोडी, वादग्रस्त वास्तूवर रामभक्तांनी मिळविलेला ताबा यामुळे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव कमालीचे अस्वस्थ झाले. बलिदान दिलेल्या कारसेवकांच्या अंत्यसंस्कारांसाठी ३१ आॅक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी कारसेवा बंद राहिली. २ नोव्हेंबर रोजी पुन्हा रामदर्शन करुन कारसेवा सुरू करण्याची घोषणा झाली. अयोध्येत प्रचंड उत्साहाचे वातावरण होते, जणू दिवाळी साजरी केली जात होती. पण काहीच वेळात होळी खेळली जाईल आणि तीदेखील रक्ताची होळी असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. २ नोव्हेंबरला अघटित घडायचे होते.

रामलल्लांचे दर्शन करून कारसेवक परतण्याच्या तयारीत होते. सकाळी ११ ला दिगंबरी आखाड्याचे परमहंस रामचंद्र दास, मणिराम छावनीचे महंत नृत्यगोपाल दास, शरयू नदीच्या तटावरून बजरंग दलाचे संयोजक विनय कटियार आणि श्रंगारहाटहून उमा भारती यांच्या नेतृत्वात कारसेवकांचे जत्थेच्या जत्थे राम जन्मभूमीकडे कूच करू लागले. अपमानाच्या आगीत जळत असलेले मुख्यमंत्री मुलायमसिंह हे बदल्याच्या भावनेने पेटले होते. विनय कटियार आणि उमा भारती यांच्या नेतृत्वात चालत असलेल्या नि:शस्र कारसेवकांवर निर्घृणपणे लाठीमार करण्यात आला. परमहंस रामचंद्र दास यांच्या नेतृत्वातील कारसेवकांवर मागील बाजूने अश्रूधुराचे नळकांडे फोडण्यात आले आणि काहीएक समजण्याच्या आधीच गोळीबार केला गेला. कारसेवक जय श्रीराम म्हणत गोळ्या झेलत धरातीर्थी पडत होते. ३० आॅक्टोबरला मशिदीच्या घुमटावर भगवा ध्वज फडकविणारे शरद कोठारी यांना कारसेवकांच्या गर्दीतून समोर आणत त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षावर करण्यात आला. त्यांच्या बचावासाठी आलेले त्यांचे बंधू रामकुमार कोठारी यांच्यावरही गोळ्या चालल्या. दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या आईवडिलांना ती दोनच मुलगे होती.

अयोध्येतील रक्तरंजित कारसेवेमुळे देशभर संतापाची भावना होती. अयोध्येत बलिदान दिलेल्या कारसेवकांचे अस्थिकलश देशभर पाठविण्यात आले. हजारो,लाखो लोकांनी दर्शन घेतले. १९९१ मध्ये मकर संक्रातीला या अस्थींचे विसर्जन प्रयागराजच्या संगमावर करण्यात आले.

कारसेवकांच्या बलिदानाने मंदिर उभारणीचा संकल्प अधिकच दृढ केला. २ आणि ३ एप्रिल रोजी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये चवथी धर्मसंसद आयोजित करण्यात आली. त्याला जोडून ४ एप्रिल रोजी बोट क्लबवर २५ लाख रामभक्तांच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत मेळावा झाला. हम मंदिर वही बनाएंगे, असा संकल्प संतांनी व्यक्त केला. सरकारला रामभक्तांच्या या सागरासमोर झुकावेच लागेल असे संतांनी ठणकावून सांगितले. मेळाव्याच्या समारोप व्हायचाच होता तेवढ्यात खबर आली की मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याआधीच म्हणजे १७ सप्टेंबरला केंद्रातील राष्ट्रीय मोर्चाच्या सरकारने विश्वासमत गमावले होते. ‘दिल्ली की गद्दी डुबो सके, सरयू में इतना पानी है’ हा कारसेवकांचा नारा सत्यात उतरला होता.

पुन्हा फडकला भगवा

३१ आॅक्टोबर १९९१ रोजी पुन्हा कारसेवक मोठ्या संख्येने अयोध्येत एकत्र आले. राम जन्मभूमी समितीने प्रतिकात्मक कारसेवेचा निर्णय घेतला होता. काही उत्साही कारसेवक पुन्हा बाबरी मशिदीच्या घुमटावर चढले आणि त्यांनी भगवा फडकविला. घुमटाची काही प्रमणात क्षतिदेखील झाली पण उत्तर प्रदेश सरकारने लगेच डागडुजी केली आणि चारही बाजूंनी भिंती बांधल्या.

आंदोलनाचे नेते स्वामी वामदेव, परमहंस रामचन्द्र दास, महंत अवैद्य नाथ, युगपुरुष परमानंद, स्वामी चिन्मयानंद  यांनी दिल्लीत पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेतली. ९ जुलै १९९२ पासून अयोध्येत साठ दिवसांचे सर्वदेव अनुष्ठान सुरू करण्यात आले.

राममंदिराचा पाया तयार करण्याचे काम हाती घेतले गेले. शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाने कथित धर्मनिरपेक्षवादी नेते अस्वस्थ होतेच. आंदोलनाचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले आणि एक आठवडा संसद ठप्प राहिली. पंतप्रधान नरसिंह राव यांनी राममंदिर आंदोलनाच्या नेत्यांना तीन महिन्यांचा अवधी मागितला आणि त्या कालावधीत अयोध्या वादावर तोडगा काढू असा विश्वासही दिला. संतांनी पंतप्रधानांच्या शब्दाचा मान ठेवला आणि राममंदिराच्या पायाभरणीचे काम थांबविण्यात आले. (क्रमश:)

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER