सत्यजित तांबेची नाराजी दूर; म्हणाले ‘महाविकास आघाडी जिंदाबाद’

Mahavikas Aghadi

मुंबई : महाजॉब्स पोर्टलवरुन महाविकास आघाडीत महाभारत सुरु झालं आहे. महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली होती. मात्र तांबे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे.

सत्यजीत तांबेंनी आणखी एक ट्विट करुन आपला उद्देशच बोलून दाखवला. “सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही मेरी कोशिक है कि ये सूरत बदलनी चाहिए” असं ट्विट तांबे यांनी केलं आहे. तसेच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आमचे नेते बाळासाहेब थोरात यांना संपर्क करुन झालेली चूक कबूल केली आहे व भविष्यात काळजी घेण्याची खात्री दिलेली आहे. त्यामुळे हा विषय इथे संपलेला आहे. महाराष्ट्र विकास आघाडी झिंदाबाद ! असे ट्विटही त्यांनी केले आहे.

दरम्यान, महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन आपली खदखद व्यक्त केली होती. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे”, असे ट्विट त्यांनी यापूर्वी केले होते. त्यानंतर शिवसेनेने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER