सुपर सिरीजची दोन गटात उपांत्य फेरी गाठणारा सात्विक साईराज पहिलाच भारतीय

सात्विक साईराज रंकी रेड्डी (Satviksairaj Rankireddy) हा सुपर सिरीज दर्जाच्या थायलंड ओपन (Thialand Open) स्पर्धेच्या पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत पराभूत झाला असला तरी त्याने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीतही उपांत्य फेरी गाठून भारतासाठी मोठे यश मिळवले आहे. सुपर सिरीज दर्जाच्या एकाच स्पर्धेच्या दोन गटात उपांत्य फेरी गाठणारा तो पहिलाच भारतीय बॕडमिंटनपटू आहे.

सात्विक फक्त 20 वर्षांचाच असून भारतीय बॕडमिंटनटूंमध्ये केवळ साईना नेहवाल हीच 21 व्या वाढदिवसाच्या आधी त्याच्यापेक्षा अधिक सुपर सिरीज स्पर्धांच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे.

साईनाने 21 व्या वाढदिवसाच्या आधी 9 वेळा सुपरसिरीज स्पर्धांची तर सात्विकने 7 वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. विश्वविजेती पी.व्ही. सिंधू हिने 5 वेळा अशी कमी वयात सुपर सिरिजची उपांत्य फेरी गाठली आहे.

थायलंड ओपनच्या पुरुष दुहेरी उपांत्य सामन्यात सात्विक साईराज व चिराग शेट्टी ही जोडी मलेशियाच्या आरोन चिया व सो वू यीक यांच्याकडून 35 मिनीटातच 18-21, 18-21 असे पराभूत झाले. 2019 मध्ये सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी त्यांनी विश्वविजेत्या ली जून हुई व लिऊ यू चेन यांना पराभवाचा धक्का दिला होता.

त्याआधी सात्विक साईराज व अश्विनी पोनप्पा ही वर्ल्ड टूर 1000 दर्जाच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी पहिली जोडी ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER