तब्बल 397 वर्षांनी शनि आणि गुरु महायुती

Saturn And Jupiter

पुणे : सूर्यमालेतील (Solar System) शनि (Saturn) आणि गुरु (Jupiter) या दोन बलाढ्य ग्रहांची येत्या 21 डिसेंबरला अतिशय निकट अशी महायुती होत आहे. दोन ग्रह अगदी निकट येतात, तेव्हा महायुती होते. अतिशय दुर्मीळ असा हा खगोलीय योग आहे. 21 डिसेंबरला रात्री 7.30 ते 9.30 या काळात शनि आणि गुरु हे एकमेकापासून केवळ 6 कला आणि 6 विकला एवढ्या अंतरावर असतील. म्हणजेच एक अंशाच्या पाचव्या भागाइतकेच अंतर या दोन बलाढ्य ग्रहांत असेल. इतके निकट अंतर असल्याने या दोन ग्रहांत महायुती होत आहे.

तब्बल 397 वर्षांनी या दोन ग्रहांतील महायुतीचा हा योग येत आहे. 16 जुलै 1623 रोजी असा योग आला होता. आता यानंतर पुन्हा अशी महायुती 2080 साली होणार आहे. एकविसाव्या शतकातील हा दुर्मीळ खगोलीय योग आहे.

शनि आणि गुरु या दोन ग्रहांची सुमारे दर 19 वर्षे 7 महिन्यांनी युती होत असते. तथापि या युतीवेळी दोन्ही ग्रहांत एवढे निकटतम अंतर असत नाही. त्यामुळेच या महायुतीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. सोमवारी 21 डिसेंबरला पश्चिम आकाशात गुरु आणि शनि दोन ग्रहांची महायुती दिसणार आहे. तीक्ष्ण नजर असलेल्या व्यक्तींना साध्या डोळ्यांनी हा दुर्मीळ खगोलीय आविष्कार दिसू शकेल. दुर्बिणीतून हे महायुतीचे दृश्य सहज पाहता येईल.

ही गुरु-शनि महायुती अतिशय बलवत्तर आणि शुभ आहे. उत्तराषाढा या रविच्या नक्षत्रात कुंभ नवमांशात ही महायुती होत आहे. भारताच्या दृष्टीने ही महायुती अनुकूल असून आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER