१० हजार कोटी पॅकेजबाबत समाधानी : ओला दुष्काळ जाहीर करा : संभाजीराजे

MP Chhatrapati Sambhajiraje

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा म्हणून १० हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केली. दिवाळीपर्यंत जाहीर केलेले हे पैसे शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. राज्य शासनाच्या या निर्णयावर समाधान असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी उभा करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही खा. संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केली.

खा. संभाजीराजे म्हणाले, मागील आठवड्यात मराठवाडयातील दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधांवर उतरून व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून या परिस्थीतीची माहिती दिली.राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पैसे उभे करता येणे शक्य आहे. प्रस्ताव पाठविल्यानंतर सात दिवसांत केंद्राचे पथक येऊन नुकसानीची पाहणी करते. त्याअंतर्गत कर्ज ही काढता येते. शेतकरी जगावा यासाठी कर्ज काढल्यास हरकत काय आहे?

गेल्या वर्षी कोल्हापूर,सांगलीत आलेल्या महापूरात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे २ हजार ८०० कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील ९०० कोटी रुपये येणार होते. पण हे पैसे परत गेल्याची आठवण आपण मुख्यमंत्री ठाकरे यांना यानिमित्ताने करुन दिली आहे, असेही खा. संभाजीराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER