शिर्डी ट्रस्टच्या भेटीनंतर, पाथरी हे साईबाबा यांचे जन्मस्थळ यावरून मुख्यमंत्री उद्धव यांची माघार

मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर समाधान झाले असून शिर्डीतील आंदोलन मागे घेत असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहावर शिर्डीतल्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित केला होता.

ठाकरे यांनी शिर्डीकरांना आज चर्चेसाठी बोलावले होते. यानंतर शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिकांनी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत समाधान झाले असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

बैठकीनंतर खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, ‘पाथरी येथे साईंचा जन्म झाला’ हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी रद्द केले आहे. पाथरीच्या विकासासंदर्भात निधी देण्यासाठी आमची हरकत नाही.

पाथरीकरांना चर्चेचे निमंत्रण नाही

आज शिर्डीकरांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असली, तरी पाथरीकरांना मात्र आजच्या चर्चेचे निमंत्रण नसल्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले.

पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा असे नाव दिलेल्या आराखड्यातून साई जन्मस्थळ हा उल्लेख काढून टाकण्याचे मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत मान्य केले. त्यामुळे शिर्डीकरांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. मात्र पाथरीकर यावर काय भूमिका घेतात यावर हा वाद पुढे चालू राहणार की मिटणार ते अवलंबून आहे.
पाथरीकरांचा दावा

साई संस्थानने 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी येथील आहे. मात्र हा उल्लेख पाथर्डी नावाने करण्यात आल्याचा दावा पाथरीकरांनी दावा केला आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये भगवना श्रीकृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितले असल्याचे म्हटले आहे. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत दावा करताना पाथरीकरांनी साईचरित्राच्या आठव्या आवृत्तीचा देखील दाखला दिला आहे. ज्या आठव्या आवृत्तीचा दाखला देत पाथरीकर साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा करीत आहेत, ती स्थळप्रत शिर्डी संस्थानच्या दप्तरांतूनच गायब असल्याचे निष्पन्न झाले आहे.

परभणी जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये साई बाबांची नोंद

साई बाबांची नोंद पाथरी गावातच जन्मल्याचा दाखला परभणी जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये समोर आला आहे. 1964 चे गॅजेट परभणी जिल्ह्याचे मूळात इंग्रजी आवृत्तीत आहे. त्याचे महाराष्ट्र शासनाने 15 सप्टेंबर, 1988 ला मराठीत रुपांतर केले. त्यात पाथरीचा उल्लेख पार्थपुरी असा आहे. ज्याचा पुढे अपभ्रंश होऊन पाथरी झाले. त्याच गॅजेटमध्ये काहींच्या मते शिर्डीचे संत साईबाबांचे जन्म गाव आहे.

शिर्डी बंद प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यशस्वी मध्यस्थी