समाधानकारक : यंदा सांगलीत झाला 25 टक्के जादा पाऊस

Sangli - Rain

सांगली : मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही, कोल्हापूर (Kolhapur) आणि साताऱ्यातील धरणातील विसर्जनामुळे सांगली (Sangli) जिल्ह्याच्या पश्चिम भागाला महापुराचा दणका बसला. यंदा मात्र वरूणराजाने सांगली जिल्ह्यावर कृपा दाखवली आहे. जत, आटपाडी, तासगाव या कायम दुष्काळग्रस्त भागात समाधानकारक पाऊस झाला.

यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा 25 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील मिरज- 568.2, तासगाव- 512.1, कवठेमहांकाळ- 583, वाळवा-इस्लामपूर- 627.4, शिराळा- 1312, कडेगाव- 577.2, पलूस- 484.4, खानापूर-विटा 765.2, आटपाडी- 739, जत- 398.4. पावसाची मिलिमीटरमध्ये नोंद झाली.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाऊस 514 मिलिमीटर पडतो. यंदा 649 मिलिमीटर पाऊस झाला. यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचे संकेत दिल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मॉन्सूनही वेळेत दाखल झाला. मात्र, यानंतरच्या प्रवासात निसर्ग चक्रीवादळाच्या रूपाने यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यांचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत राहिला. सुरवातीच्या टप्प्यात मॉन्सूनचा जोर नेहमीसारखा नव्हता. जून, जुलैमध्ये झालेला पाऊस आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाचा विचार केल्यास ऑगस्टमध्ये अधिक पाऊस झाला.

सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले, तरी तिसऱ्या आठवड्यात आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळीत सुधारणा झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात 34.40 टीएमसी पाणीसाठा असून, धरण 100 टक्के भरले आहे. कोयना, दूधगंगा, तुळशी, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी धरणेही 100 टक्के भरली आहेत. धोम धरणात 13.27 टीएमसी, कण्हेर धरणात 10.03 टीएमसी पाणीसाठा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER