संतोषने पिकवला लॉकडाउनमध्ये हशा

Santosh juvekar - Maharastra Today

लॉकडाउन म्हटलं की आता प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिवसरात्र घरी बसून राहिल्याने येणारा कंटाळा दिसत आहे. कुठेच बाहेर जायचं नाही ही कल्पना अनेकांसाठी त्रासदायक आहे. पण सध्या तरी या नियमाला इलाज नाही. पण लोकांचा लॉकडाउनमधील कंटाळा घालवण्याचे काम सेलिब्रिटी कलाकार मंडळी करत आहेत. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर याने बाजी मारली आहे. एरव्ही पडद्यावर डॅशिंग बॉय अशी इमेज असलेला संतोष प्रत्यक्ष आयुष्यात खूपच मिश्कील असल्याचे दाखले त्याच्या सोशलमीडियापेजवरील पोस्टमधून दिसतात. सध्या संतोषची चर्चा आहे ती लॉकडाउनमध्ये त्याने सोशलमीडियात शेअर केलेल्या एका विनोदी पोस्टची. या लॉकडाउनमध्ये मी इतका घरकोंबडा झालोय की घरातले कधीतरी मलाच शिजवून खातील की काय असं वाटू लागलयं अशी पोस्ट करत सोबत संतोषने एक होमलूकमधला फोटोही पोस्ट केला आहे. संतोषची ही पोस्ट म्हणजे सध्या लॉकडाउनमध्ये घरी बसून असलेल्या प्रत्येकाच्या मनातील भावना असल्याने ही पोस्ट प्रचंड व्हायरल तर होते आहेच पण संतोषच्या या मिश्किल बोलण्यावर त्याचे चाहते मात्र चांगलेच फिदा झाले आहेत.

गेल्यावर्षीच्या कोरोना लॉकडाउनच्या कथा प्रत्येकानेच सोशलमीडियावर शेअर केल्या. कुणी कॉफी बनवली तर कुणी पेंटिग्ज केली. कुणी कविता रचल्या तर कुणी चक्क अख्खा स्वयंपाक केला. यामध्ये सेलिब्रिटीही काही मागे नव्हते. आणि सर्वसामान्यांनी लॉकडाउनमध्ये काय केलं यापेक्षा सेलिब्रिटी कलाकार लॉकडाउनमध्ये काय करत असतील हे जाणून घेण्याची इच्छा जास्त असते. अर्थात सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांची ही इच्छापूर्ती करत फोटो, व्हिडिओ शेअर केले. लाइव्ह ऑनस्क्रिन गप्पा मारल्या. पण पुन्हा शूटिंग सुरू झालं आणि कलाकार बिझी झाले. आता पुन्हा लॉकडाउन सुरू झाला तेव्हा जे शूटिंगनिमित्त महाराष्ट्राबाहेर गेलेले नाहीत ते कलाकार काय करत असतील याची उत्सुकता पुन्हा शिगेला पोहोचली. संतोषने यावर कडी करत स्वतालाच घरकोंबडा म्हटले आहे.

यापूर्वीही संतोषने त्याच्या फोटोंना अफलातून कॅप्शन देत नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. मध्यंतरी संतोषने त्याचे केस वाढवले होते आणि त्यावरही कोपरखळी करत फॉलोअर्सचे मनोरंजन केले होते.

दोन महिन्यांपूर्वी संतोष डेट भेट या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. त्या प्रवासातील अनेक भन्नाट किस्से आणि फोटो शेअर केले होते. संतोषच्या सोशलमीडिया पेजवरील फोटो पाहण्यासोबत त्याने त्यांना काय कॅप्शन दिलीय हे पाहणं खूपच रंजक असतं. जेव्हा संतोष डेट भेट या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला तेव्हाही या सिनेमाचा दिग्दर्शक आणि मित्र लोकेश गुप्ते याला त्याने खूप धन्यवाद दिले होते. संतोष म्हणाला होता की, लंडन हे माझं ड्रीम डेस्टीनेशन आहे. पण यापूर्वी मी हे स्वप्नच पाहत होतो. आता या सिनेमातील संधी आणि लंडन भटकंती अशी डबल ट्रिट मला लोकेशने दिली. या सिनेमात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णीही दिसणार आहे. तिच्यासोबतच्या फोटोंनाही संतोषने हटके कॅप्शन दिल्या होत्या. संतोष आणि त्याच्या फोटोओळी यांची ही भन्नाट केमिस्ट्री आता पुन्हा लॉकडाउनमधला घरकोंबडा या फोटोमध्येही दिसत आहे. संतोषने पोस्ट केलेला फोटो आणि त्याची कॅप्शन हे खरच सध्या घरी बसलेल्या अनेकांच्या आयुष्यातील सत्य आहे. त्यामुळेच संत्या, तू तर आमच्या मनातलं बोललास रे अशीही प्रतिक्रिया त्याला आली आहे.

या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून संतोषने त्याच्या मालिकेतील करिअरला सुरूवात केली. तर आणि मकरंद राजाध्यक्ष या नाटकातून त्याने रंगभूमीवरील पदार्पण केले. गेली २१ वर्षे संतोष मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. मोरया, शहाणपण देगा देवा, झेंडा यासह त्याचे अनेक सिनेमे गाजले आहेत. अस्सं सासर सुरेख बाई आणि वाय झेड या त्याच्या नुकत्याच प्रसारीत झालेल्या मालिका आहेत. संतोषच्या अनेक छंदापैकी त्याला स्वयंपाक करण्याचीही आवड आहे, त्यामुळेच त्याच्या पोस्टमधल्या घरकोंबडा आणि घरातले मलाच शिजवून खातील या दोन शब्दांनी सोशलमीडिया वर्तुळात हशा पिकवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button