ना. सतेज पाटील ठरले किंगमेकर

Satej Patil

कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर किंवा शिक्षक मतदार संघापैकी कोणत्याही एकाची उमेदवारी काँग्रेसकडे घ्यावी, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहिल, असे जाहीररित्या सांगणाऱ्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शिक्षक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांना विजय करुन किंगमेकर ठरले आहेत.

प्रा. आसगावकर यांच्या विजयासाठी गेली महिनाभर ना. पाटील यांनी कोल्हापूरसह पाच जिल्हे पिंजून काढत यशस्वी जोडण्या घातल्या. ज्यांची ओळख केवळ कोल्हापूरात करवीर तालुका, आणि एका शैक्षणिक संस्थांपुरती मर्यादित होती, अशा प्रा. जयंत आसगावकर यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील प्रत्येक शिक्षक मतदारांपर्यंत पोचवत त्यांना विजयी करण्यामध्ये गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील बाहुबलीची भूमिका निभावली आहे.

शिक्षक मतदार संघातील प्रा. जयंत आसगावकर हे शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तिमत्व यापलीकडे ओळख नव्हती. अशा व्यक्तीमत्वासाठी ना. पाटील यांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती. मतदारांच्या याद्या, त्यांना सोशल मीडियावरून संदेश, काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांच्याकडून भविष्यात होणाऱ्या कामांचा अजेंडा सर्व शिक्षण संस्थेसह वैयक्तिक शिक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी सतेज पाटील यांनी आपली यंत्रणा सक्षम आणि सतर्क ठेवली.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांना पराभवाचा धक्का देत उद्योजक चंद्रकांत जाधव यांना आणि कोल्हापूर दक्षिणमधून त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांना पहिल्याच प्रयत्नांत आमदार करण्यामध्ये सतेज पाटील यांनी बाहुबलीची भूमिका निभावली आहे. त्यामुळे, सतेज पाटील यांनी आपला शब्द खर करुन दाखवत काँग्रेस पक्षात आपला दबदबा निर्माण केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER