उदयनराजेंना लवकरच केंद्रात मंत्रिपद; राज्यसभेवर निवड निश्चित

Udyanraje Bhosale

सातारा :- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीवारी निश्चित मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी, त्यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची निवड करण्यात येणार असून, त्यापाठोपाठ केंद्रात मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात आणखीनच बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १०५ आमदार निवडून येऊनदेखील त्या पक्षाला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. या परिस्थितीत आपली ताकद पुन्हा वाढविण्याची तयारी भाजपाने सुरू केलेली आहे.

‘पुन्हा बाप काढाल तर याद राखा!’

राज्यसभेचे महाराष्ट्रात एकूण १९ खासदार आहेत. त्यापैकी ७ खासदार २ एप्रिल २०२० रोजी निवृत्त होणार आहेत. यामध्ये शरद पवार, मजिद मेमन (राष्ट्रवादी), अमर साबळे (भाजपा), राजकुमार धूत (शिवसेना), हुसेन दलवाई (काँग्रेस), रामदास आठवले (रिपाइं), संजय काकडे (अपक्ष) यांचा निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये समावेश आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश आहे. आता त्यांची मुदत २ एप्रिल रोजी संपत आहे. भाजपाचे दुसरे खासदार अमर साबळे यांची मुदतही २ एप्रिल रोजी संपणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर माजी खासदार उदयनराजे भोसले यांना नियुक्ती दिली जाण्याची शक्यता आहे; कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीत मंत्री रामदास आठवले यांना बाजूला काढण्याची हिंमत भाजपा करू शकत नाही.

आता राहिली रिक्त होणारी दुसरी जागा अमर साबळे यांची. या जागेवर उदयनराजेंची वर्णी लागू शकते. खासदार किरीट सोमय्या हेदेखील राज्यसभेवर निवड होण्यासाठी आग्रही आहेत; परंतु महाराष्ट्रात भाजपाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठांना उदयनराजेंचे हात बळकट करण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे उदयनराजेंनाच खासदारकीची संधी दिली जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.