सातारा लोकसभा : सातारा म्हणजे उदयनराजे, उदयनराजे म्हणजे सातारा

Chavan-Bhosale-Pawar

देशात सध्या मोदी लाट आहे की नाही यावर वाद होऊ शकतो पण साताऱ्यामध्ये एका माणसाची नेहमीच लाट असते.एकावर एक सात खुर्च्या टाकून जाहीर सभेमध्ये तो सगळ्यात वरच्या खुर्चीवर बसतो आणि छातीठोकपणे सांगतो, “साताऱ्यातील सर्व सत्ता माझ्या हाती आहे”.त्याच्या या वागण्याला लोक उद्दामपणा समजत नाहीत.त्याच्यातील आत्मविश्वासाचे लोक दिवाने आहेत.त्याची स्टाईल लोकांना भावते. तरुणाई तर त्याच्यामागे पागल आहे. हा नेता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले.सातारा हा अतिशय समृद्ध असा मतदारसंघ. साखर कारखानदारी, बागायती, शेती आणि जोडधंदा यामुळे प्रचंड श्रीमंती या ठिकाणी दिसते. अनेक मुख्यमंत्री मंत्री या जिल्ह्याने देशाला आणि राज्याला दिले.

ही बातमी पण वाचा : उदयनराजे भोसले यांच्यावर जनता नाराज : चंद्रकांत पाटील

2009 च्या निवडणुकीत उदयनराजे यांचे मताधिक्य होते तीन लाख 66 हजार 594 चे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले,माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले अशा दिग्गजांनी या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केलेले आहे.  या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4, काँग्रेसकडे एक तर शिवसेनेकडे एक जागा आहे.2014 मध्ये प्रचंड मोदी लाट होती.या मोदी लाटेत देशातील अनेक दिग्गज अक्षरशः वाहून गेले पण, उदयनराजे जिंकले आणि तेही तब्बल 2 लाख 97 हजार 515 मतांनी .सातारकरांवर उदयनराजेंची जादू आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

उदयनराजे हे छत्रपति शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. त्यांचे वडील प्रतापसिंह राजेभोसले यांच्या अकाली निधनानंतर आई कल्पनाराजे भोसले यांनी उदयनराजे यांचा सांभाळ केला. कल्पनाराजे यांना साताऱ्यामध्ये प्रचंड  मान होता. साताऱ्याच्या गादीवर लोकांची अलोट श्रद्धा आजही कायम आहे. त्यातही हँडसम दिसणारा,जीन्स पॅन्ट घालणारा, मध्येच इंग्लिश बोलणारा आणि  लोकांमध्ये  बिनधास्त मिसळणारा स्टायलिश उदयनराजे हा सातारकरांच्या आणि विशेषतः तेथील  तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. उदयनराजे, जात धर्म न मानता सर्व सामान्य लोकांच्या, जलमंदीर पॅलेसला आलेल्या कोणत्याही तक्रारीचा तात्काळ न्यायनिवाडा करतात.

ही बातमी पण वाचा : रामटेक लोकसभा : रामटेकची लढत शिवसेनेसाठी यंदा कठीणच

यावेळीही उदयनराजेंच्याशिवाय राष्ट्रवादीला पर्याय नाही. निवडून आल्यापासून एकही दिवस उदयनराजे राष्ट्रवादीबद्दल प्रेमाने आदराने बोलले नाहीत पण, तरीही त्यांना उमेदवारी देणे ही राष्ट्रवादीची आणि शरद पवार यांची मजबुरी आहे. कारण उदयनराजेंना नाकारणे म्हणजे लोकसभेची एक जागा गमावणे हे पवार यांना चांगलेच कळते. त्यामुळे उदयनराजे कसेही बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना सांभाळून घेतले जाते. पक्षाचे जिल्ह्यातील आमदार उदयनराजेंच्या  वाढदिवसाला शरद पवार उपस्थित असूनही पाठ दाखवतात, प्रचंड तळतळाट करतात पण तरीही उदयनराजेंना सोडणे पवारांना शक्य नसते. कारण त्यांना उमेदवारी दिली नाही तर ते लगेच भाजपात जाऊन प्रचंड फरकाने विजयी होतील याची पवार यांना कल्पना आहे.एकूणच सातारा लोकसभेचे संपूर्ण राजकीय समीकरण केवळ आणि केवळ उदयनराजे भोसले या एका नावाभोवती सदैव फिरत असते. महाराष्ट्रातील कोणत्या एका जागेचा निकाल आत्ताच सांगता येईल तर तो म्हणजे साताऱ्याचा.

ही बातमी पण वाचा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : आवाज शिवसेनेचाच

सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे मात्र सातारा शहराच्या राजकारणाला भोसले घराण्यातील भाऊबंदकीची एक कटू किनार आहे. उदयनराजे आणि अभयसिंहराजे भोसले या दोन चुलत्यांमध्ये वितुष्ट होते.आज उदयनराजे आणि अभयसिंहराजे यांचे पुत्र व सातारा शहराचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंह यांच्यातून विस्तव जात नाही. नऊ वर्षे या दोघांनी आपसातील सगळे मतभेद बाजूला ठेवून मनोमिलन केले होते.परंतु नगरपालिका निवडणुकीत दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. शिवेंद्रसिंह यांच्या पत्नी वेदांतिका यांच्याविरुद्ध उदयनराजे यांनी माधवी कदम या आपल्या समर्थक महिलेला उभे केले. माधवी कदम विजयी झाल्या. हा शिवेंद्रसिंह यांना मोठा धक्का होता. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून आघाड्या करून लढले होते.. शरद पवारांनी उदयनराजे व शिवेंद्रराजे ह्यांच्या मनोमिलनाचा संपूर्ण गाजावाजा केला आहे, तरी शिवेंद्रसिंह हे आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे  यांना कितपत साथ देतात हा प्रश्नच आहे. शिवेंद्रसिंह सोबत आले नाहीत तरीही उदयनराजेंच्या विजयावर त्याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही.

ही बातमी पण वाचा : हातकणंगले लोकसभा : राजू शेट्टींची प्रतिमा युतीच्या ताकदीपेक्षा मोठीच

जिल्हा परिषद जिल्हा बँकेपासून सातारा जिल्ह्यातील बहुतेक सर्व संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. भाजपाचे या जिल्ह्यात फारसे वर्चस्व नाही. जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था देखील फारशी चांगली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच जिल्ह्यातील कराडचे आमदार आहेत पण काही वर्षांपासून राष्ट्रवादीच्या वर्चस्वामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. युतीमध्ये सातारा लोकसभेची जागा शिवसेना लढत आहे पण त्यांच्याकडे दमदार उमेदवार नाही. 2014 मध्ये शिवसेनेने ही जागा रिपब्लिकन पक्षासाठी सोडली होती. सामना करू शकेल असा उमेदवार विरोधकांकडेही नाही. एकूणच आज तरी उदयनराजे यांना पर्याय दिसत नाही.

समीकरणे 

सातारा लोकसभा मतदार संघात इतर मागासवर्गीय समाजाचे वर्चस्व असले तरी एकसंधपणा नसल्यामुळे ह्या मतदार संघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. खुल्या प्रवर्गातील मतदार ३९ %, अनुसूचित जमाती ०१ %, इतर मागास वर्गातील ३२ % , अनुसूचित जातींचे ०८ % तर इतर २० % मतदार आहेत.