खचून न जाता…राज्यातील या गावाने शेतकऱ्यांपुढे ठेवला नवा आदर्श!

वेळेत कर्जफेड करणारा राज्यातील 'एकमेव' असा गाव

सातारा : कर्जबाजारीपणा, नापिकी, निसर्गाचा लहरीपणा अश्या अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात सुरूच आहे. त्यातच राज्यातील अन्नदाता बळीराज्याने कर्जमाफी सहित आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा मार्ग निवडून तो रस्त्यावर उतरला आहे. तर यापेक्षा वेगळा एक गाव असा ही आहे, ज्याला कर्जमाफीची गरजच नाही. ऐकून जरा विचित्र वाटले असणार की राज्यातील अश्या कोणत्या गावाला कर्जमाफीची गरज नाही. पण राज्यातील सातारा मध्ये येणाऱ्या ”बोरगाव बुद्रुक” या गावाची कहाणी जरा निराळीच आहे. ”बोरगाव बुद्रुक” हा गाव वेळेत कर्जफेड करणारा गाव म्ह्णून ओळखला जातो. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांपुढे या गावाने एक नवा आदर्श मांडला आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात येणाऱ्या ”बोरगाव बुद्रुक” या गावाची कहाणी सुद्धा राज्यातील अन्य गावांप्रमाणेच होती. निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे या गावातील शेतकरी सुद्धा त्रस्त होते. मात्र ते थांबले नाहीत…. खचलेही नाहीत…. त्यांनी एक नवा पर्याय शोधण्याला सुरवात केली. आणि यातूनच या गावाने सर्वांपुढे एक आदर्श ठेवला.

”बोरगाव बुद्रुक” या गावातील शेतकऱ्यांनी 1989 साली स्वबळावर शेती ओलिताखाली आणण्याचं ठरवले. यासाठी त्यांनी गावात लोक वर्गणी काढण्यास सुरवात केली. जमा झालेल्या लोक वर्गणीतून त्यांनी गावात सहकारी भू-विकास जलसिंचन संस्था उभी केली. यानंतर गावात पाणी आणण्यासाठी या शेतकऱ्यांनी कर्ज काढून, गावातच नव्हे तर गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाइपलाईनने पाणी सुद्धा आणले. यांनतर काढलेले कर्ज शेतकऱ्यानी मोट्या मेहनतीने फेडले. यानंतर गावातील प्रत्येक शेतकरी आनंदात शेती करत असतानाच गावातील पन्नास फुटाची विहीर डिसेंबरमध्ये कोसळली. तरी या शेतकऱ्यांनी खचून न जात तो ताट मानेन उभा राहिला.

पुन्हा गावात पाणी आणण्यासाठी या ग्रामस्थांनी ४० लाख जमा करत थेट धरणातून गावात पाणी आणून शेती करायला सुरवात केली. या गावतली तब्बल 200 एकर जमीन ओलिताखाली आली. या गावातील शेतकरी आज वेगवेगळ्या प्रकारची शेती करत आहेत. काही ग्रामस्थांनी तर एकजूट होऊन 30 एकर जमिनीत दीड हजार कलमी आंब्यांची झाडे लावली आहे. अश्या या ‘ बोरगाव बुद्रुक’ गावाकडून राज्यातील शेतकऱ्यांनी खरंच यशाचा मंत्र घेण्याची आज नितांत गरज आहे.