ग्रामस्थांकडून सरपंचाची निवड करण्याचा प्रस्ताव विचाराधीन – पंकजा मुंडे

नांदेड : नुकताच संपन्न झालेल्या नागराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनतेमधून नगराध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजपला बराच लाभ मिळाला होता. तसाच लाभ ग्रामपंचायतीमध्ये घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील ८ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यावेळी जनतेतून सरपंच निवडण्याच्या निर्णयाची अंमलबाजवणी करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. विचाराधीन असलेल्या प्रस्तावानुसार उपसरपंचांची निवड मात्र ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून केली जाऊ शकेल, तर तीन चतुर्थांश बहुमतानेच सरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल.

येत्या एक महिन्यात सदर प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाकडून मान्यता प्रदान मिळवून आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या संबंधीचे विधेयक पारित करुन सप्टेंबर-ऑक्टोबरमधील निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असल्याचा पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान जनतेमधून नगराध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीचा भाजपला फायदा झाला होता. तसाच लाभ ग्रामपंचायतीमध्ये घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र या प्रस्तावासाठी शैक्षणिक पात्रतेचाही विचार करण्यात येत आहे. थेट जनतेतून सरपंच निवडण्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता असावी का, याबाबत ग्राम विकास विभाग विचार करत आहे. निरक्षर व्यक्तीला लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढता येते, तर सरपंचांसाठी अशी अट ठेवणे योग्य होईल का, ते घटनात्मक तरतुदीच्या विसंगत ठरेल का यावर विचार सुरु आहे.