मास्क न काढण्याची साराची योग्य भूमिका

कलाकारांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी फोटोग्राफर धडपड करीत असतात. त्यांच्या घरापासून ते विमानतळापर्यंत ते कलाकारांचा पाठलाग करीत असतात. पापाराझींच्या या पाठलागामुळे कलाकार कधी कधी रागावतातही. कलाकार असलो तर काय झाले प्रायव्हसी मिळावी हा आमचा हक्क आहे असे कलाकारांचे म्हणणे असते. पण फोटोग्राफर त्यांना ही प्रायव्हसी देत नाहीत. फोटोग्राफरचेही पोट फोटोंवर अवलंबून असल्याने कलाकार त्यांना सहकार्य करतात. पण कधी कधी फोटोग्राफर अति करतात आणि त्यामुळे कलाकार रागावतातही. मोठे कलाकार सोडा तैमूरसारखा छोटा पोरगाही फोटोग्राफर्सना फोटो काढू नको असे सांगतो यावरून तुम्हा काय समजा ते समजा. सारा अलीनेही (Sara Ali Khan) एअरपोर्टवरून येताना फोटोग्राफर्सनी फोटोसाठी तोंडावरचा मास्क काढण्याची विनंती केली. पण साराने ती मान्य केली नाही. यासाठी साराचे कौतुक केले जात आहे.

कोरोनाने (Corona) जगभरात थैमान घातले असून यावर लस जरी आली असली तरी त्याचा धोका कमी झालेला नाही. लस आली असली तरी मास्क वापरणे बंधनकारक असून कोरोनाचा संसर्ग मास्कमुळे रोखू शकतो असे सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलेेले आहे. काही जण मास्त वापरत नसले तरी कलाकार मात्र आवर्जून मास्क वापरतात. कलाकार सध्या शूटिंगसाठी बाहेर पडले असून फोटोग्राफर फोटोंसाठी त्यांच्या मागावर असतात. सारा अली तिच्या सिनेमाच्या शूटिंगला जाण्यासाठी विमानतळावर आली होती. त्यावेळी फोटोग्राफर्सनी तिला घेरले. पांढरा सलवार सूट परिधान केलेल्या साराने मास्कही लावला होता.

साराचा चेहरा व्यवस्थित दिसावा यासाठी फोटोग्राफर तिला मास्क काढ म्हणून सांगत होते. सारा मास्क काढत नव्हती आणि फोटोग्राफर मात्र मास्क काढण्यासाठी सांगत होते. साराने सुरुवातीला हसत हसत त्यांना नकार दिला. मात्र ते ऐकेनासे झाले तेव्हा मात्र साराने मास्क न काढता प्रत्येकाने सुरक्षेसाठी मास्क लावणे आवश्यक असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकाराचा व्हीडियो व्हायरल झाला आहे. या व्हीडियोवर प्रतिक्रिया देताना सगळ्यांनी साराची प्रशंसा करीत साराने केले ते योग्य केले असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER