
क्रिकेट महिलासुध्दा खेळत असल्या तरी अजुनही एकूणच क्रिकेटजगतावर पुरुषांचाच दबदबा आहे. गेल्या दोन दशकात महिला क्रिकेट बऱ्यापैकी पुढे आले आहे आणि त्याची लोकप्रियतासुध्दा वाढली आहे. मिताली राज, हरमनप्रीत, झुलन गोस्वामी, स्मृती मानधना, मेग लॕनिंग, एलिस पेरी, एलिसा हिली, सना मीर अशी महिला क्रिकेटपटूंची नावे आता पटकन आठवू लागली आहेत. असंच आणखी एक नाव आहे सारा टेलर (Sarah Taylor). हे नाव चांगलं लक्षात ठेवा कारण या नावाच्या खेळाडूने महिलांसाठी क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास घडवला आहे. महिलांसाठी एक नवे दालन खुले केले आहे.
सारा टेलर ही पहिली अशी महिला क्रिकेटपटू ठरणार आहे जी पुरुषांच्या संघाच्या एका प्रशिक्षकाची (Coach) जबाबदारी पार पाडेल. तिला ससेक्स काउंटी क्लबने आपल्या प्रशिक्षकांच्या चमूमध्ये घेतले आहे आणि अर्थातच ती एक नावाजलेली आणि सफल यष्टीरक्षक (Wicketkeeper) राहिलेली असल्याने ती ससेक्सच्या पुरुष खेळाडूंना यष्टीरक्षणात मार्गदर्शन करणार आहे.
आतापर्यंत महिलांच्या संघांनाही पुरुषच प्रशिक्षक राहिलेले आहेत पण साराने आता हा प्रवास उलट केला आहे आणि पुरुष क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देणारी ती पहिली महिला ठरणार आहे.
सारा ही स्वतः तिच्या काळातील आघाडीची यष्टीरक्षक होती. तिने 13 वर्षांच्या काराकिर्दीत 226 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना यष्टीमागे सर्वाधिक 232 बळी टिपले आहेत. याशिवाय 7 हजाराच्यावर आंतरराष्ट्रीय धावासुध्दा तिच्या नावावर आहेत.
या संधीबद्दल सारा म्हणते की, क्लबच्या यष्टीरक्षकांसोबत काम करायला मिळणार असल्याचा मला आनंद आहे. ससेक्सच्या संघात बेन ब्राऊन व फिल साॕल्टसारखे चांगले यष्टीरक्षक आहेत आणि त्यांना माझ्या अनुभव व कौशल्याचा फायदा देण्यात मला आनंदच आहे. गोष्टी साध्या-सोप्या आणि सरळ ठेवण्यावर माझा विश्वास आहे आणि हाती ग्लोव्हज असताना मुलभूत गोष्टीत प्राविण्य मिळवावे हेच माझे लक्ष्य असेल.
ससेक्स संघाचे मुख्य प्रशिक्षक जेम्स कर्टली म्हणाले की, साराकडे आमच्या खेळाडूंना देण्यासारखे भरपूर आहे. यष्टीरक्षणात तर ती तरबेज आहेच पण एक व्यक्ती म्हणूनही ती संघातील वातावरणात फार मोठा बदल घडवून आणेल. खेळाच्या विशिष्ट परिस्थितीत तिचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरणार आहे. तिचे संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे आणि तिच्याकडे उपयोगी कल्पना आहेत. त्यामुळे तीआमच्या चमूत आल्याने आमची ताकदच वाढणार आहे.
साराने वयाच्या 30 व्या वर्षीच 2019 मध्ये निवृत्ती घेतली होती पण तोवर सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक असा लौकिक तिने कमावला होता. निवृत्तीनंतर ती इस्टबोर्नमधील एका शाळेत क्रीडा व जीवन कौशल्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. ससेक्ससोबत खेळाडू म्हणून तिची 15 वर्षांची कारकिर्द राहिली आहेआणि अलीकडेच तिने क्लबसाठी आॕनलाईन मनस्वास्थ्य मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे.
क्रिकेटमध्ये साराने हा इतिहास घडवला असला तरी टेनिसमध्ये मात्र महिलेने पुरुष खेळाडूला प्रशिक्षण दिलेले आहे. अॕमेली माॕरेस्मो हिने ब्रिटीश टेनिसपटू अँडी मरेला प्रशिक्षण दिल्याचे उदाहरण आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला