कोल्हापुरातील सराफ बाजार ठप्प

Saraf bazaar in Kolhapur

कोल्हापूर : सोनी दरात प्रचंड वाढ झाल्याने सराफ बाजारात उलाढाल थांबली आहे. शेकडो कामगार अक्षरशः बसून आहेत. सध्या अमेरिका व इराण या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. शेअर मार्केट मध्ये कमालीची घसरण झाल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ होत आहे. याचा तोटा कोल्हापूरच्या सराफी बाजराला बसला असून सराफ बाजार ओस पडला आहे. सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे दिवसाला होणारी पाच कोटीची उलाढाल या आठवड्यात निम्यापेक्षा कमी झाली आहे. कोल्हापूर शहरात नव्या वर्षापासूनच सोन्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. १ जानेवारी रोजी सोन्याचा दर ३८ हजार ८०० होता. तोच दर शुक्रवारी प्रती तोळा ४१ हजार १५० रुपयांवर गेला. सोमवारी हाच दर ४१ हजार ८०० रुपयांवर पोहोचला.

तर चांदीच्या दरात ही तेजी आली असून बुधवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८ हजार ३०० रुपये होता. वाढत्या दरामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांनी सोने बाजाराकडे पाठ फिरवली असल्याने सराफ व्यवसायिकांनी ही तूर्तास सोने खरेदी थांबविली आहे. आखाती देशातील तणाव निवळल्यानंतर सोन्याच्या चढया दरात घसरण होण्याची चिन्हे आहेत.

परिणामी चढयादराचे सोने खरेदी करून कमी दरात विक्री करावी लागल्यास सोने व्यवसायिकांचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे सोने व्यावसायिक सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. मात्र, यामुळे सराफ बाजारातील उलाढाल थंडावली असून त्याचा फटका शेकडा कामगारांना बसला आहे. काम नसल्यामुळे कामगार अक्षरश: बसून आहेत.