सप्तपदी मी रोज चालते !

सप्तपदी

कालच्या “जुळूनी येती रेशीमगाठी !”या लेखात भावी जोडीदाराच्या निवडीबाबत काही गोष्टी काल बघितल्या. जोडीदाराची निवड तर होते. आणि आता मनात असतात स्वप्न ,हळवेपणा आणि हुरहूर दोघांच्याही ! आणि नकळत याबरोबर आपोआपच सोबतीला येतात काही अपेक्षा. कारण मला जे वाटत असतं तेच त्याला पण वाटत असणार किंवा मला वाटतंय ते तिला न बोलता समजावं ,असं हक्काचं स्थान मिळाल्याची सुखद जाणीव दोघांमध्येही असते.

पण फ्रेंड्स ! अगदी काल लग्न झालं आणि अगदी आजच या हृदयीचं त्या हृदयी कळालं .असं होत नाही .लग्नातली सप्तपदी (Saptapadi ) चाललेली असतेच. पण प्रत्यक्षातलिही सप्तपदीची पाऊले चालताना गरज असते त्या पावलागणिक समजून घ्यायच्या काही गोष्टींची !

एकदा वाचन करताना ,डॉक्टर जॉन ग्रे यांचं “मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमेन आर फ्रॉम वीनस ” हे पुस्तक वाचनात आले .त्यांनी यासंबंधी सखोल अभ्यास केला आहे. डॉक्टर रमा मराठे यांनी त्याचे मराठी भाषांतरही केले आहे ,”तो आणि ती” या नावाने!

त्यातून एक गोष्ट लक्षात येते की स्त्री पुरुषांची विचार करण्याची पद्धत, भावना व्यक्त करण्याची पद्धत, एकूणच मानसिक जडणघडण परस्परांपेक्षा खूप वेगळ्या आहेत, हे जर समजून घेतले तर परस्परांना समजून घेणे शक्य होते, अगदीं सहजतेने ! अर्थात व्यक्तीगणिक यात फरक असणारच कारण प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते.

पण सहसा काही तक्रारी कॉमन असतात. की “याला अगदीच बोलायला नको असतं”,” सारखा मोबाईलवर गेम खेळतो” किंवा” फिरायला घेऊन जात नाही ,तुझे माझ्यावर प्रेमच नाही”, भावना बोलूनच दाखवत नाही “आणि असेच!
किंवा त्याच्या कडून तक्रारी असतात कि ,”तेच तेच सांगून कटकट करू नको!”,” मी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही”,” सारखे प्रश्न विचारू नको !काळजी करून गुदमरून टाकलेले आवडत नाही”, अति प्रेमाचा काच होतो वगैरे!
म्हणूनच सप्तपदीची सात पाऊले चालताना कानात काहीतरी सांगावेसे वाटते ,दोघांनाही ! जॉन ग्रे यांच्या संशोधनानुसार दोघांच्याही , म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये जाणून घेतली तर ते सोपे जाते.म्हणूनच आज सात पाऊले चालताना कानात काही सांगावेसे वाटते.

१ ) पहिलं पाऊल उचलताना हळूच ऐका !अनेकदा स्त्री दिवसभरातील घडामोडींबाबत सहज संवाद साधते. घरातील,आणि एकूण तिच्या अनेक अडचणी सांगते, तेव्हा तिला फक्त गरज असते ते ते कोणीतरी जीवाभावाच्या व्यक्तीने ते ऐकून घेण्याची. तिची प्रेमाची गरज असते ती. परंतु तो क्षमतेला महत्त्व देतो. त्याच्यामुळे तिने सहज संवाद साधला असतो ,त्यावर एकदम उपायोजना सांगून तो,(अग हे किती सोप्प! Be cool ! ) अस आपलं प्रेम व्यक्त करतो. पण तिला मुळी उपाय नकोच असतो. तिला फक्त एकूण घेण्याची गरज असते मग काय होतं की तो ऐकल्यासारखं करतो, आणि अर्धवट ऐकतो. ते तिच्या लक्षात येतं. आणि मग तक्रारी सुरू होतात.

२) म्हणूनच दुसरा पाऊल उचलताना सांगावसं वाटतं ! जेव्हा स्त्री पुरुषावर प्रेम करते तेव्हा त्याचा विकास, प्रगतीला हातभार लावणे हे आपलं परमकर्तव्य समजते. आणि त्याला सूचना देण्याची एकही संधी सोडत नाही. त्याला सूचना नकोच असतात, हवा असतो फक्त स्वीकार ! पुरुषांमधील स्वत्वाची जाणीव त्याच्या कार्यकुशलता आणि कर्तृत्वाची निगडित असते आणि कोणत्याही बाबतीत कर्तुत्व सिद्ध करणं हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं.

यासाठी एक उदाहरण बघा. त्या दोघांना लग्न ठरवण्याच्या आधी बोलण्यासाठी वेळ दिला. त्याने तिला सांगितलं की,” मी नोकरी सोडून व्यवसाय करणार आहे. त्यात मला तुझी मदत लागेल. माझे भाऊ बहीण इतर नातेवाईक माझ्याकडे राहतील. त्यांचे शिक्षण करायची आहेत आपल्याला”. तिला खूप छान वाटलं. तिला वाटलं होतं ी नवर्‍याच्या व्यवसायात आपल्याला मदत करायला मिळणार, छान दोघं मिळून व्यवसाय वाढवू. तशी ती महत्त्वाकांक्षी. पण लग्न झाल्यावर हे स्पष्ट झालं की तो व्यवसाय करणार म्हणजे त्याचे घराकडे दुर्लक्ष होणार, म्हणून संपूर्ण घर सांभाळण्याची जबाबदारी तिची असणार होती आणि ही मदत त्याला अपेक्षित होती.

थोडक्यात त्याला सूचना नकोत तर हवा फक्त स्वीकार आणि कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी, आणि यासाठी, याबाबतीत त्याच्यावर विश्वास.

३) तिसरे पाऊल उचलताना सांगावसं वाटतं की, मुळातच दोघांचीही विचार करण्याची पद्धती भिन्न आहे. स्त्रिया या बोलत-बोलत विचार करतात. बोलता-बोलता त्यांना उत्तरे सापडतात आणि मग त्यांना हलकं वाटतं. या उलट पुरुष ! त्यांच्याकडे जर काही समस्या उभ्या राहिल्या तर त्यांचे बोलणे बंद होऊन जाते. ते मनातल्या मनात विचार करत असतात आणि मार्ग शोधत असतात. अशा वेळी ते एकटे बसतात, पेपर वाचतात ,टीव्ही पाहतात, मोबाईल खेळतात. त्यावेळी त्यांना प्रश्न न विचारता, मदत करायचा कुठलाही प्रयत्न केला नाही आणि एकट्याला सोडून दिलं तर थोड्याच वेळात त्यांना त्यांचा मार्ग सापडतो आणि ते बोलू लागतात. अशावेळी नवीन मुलगी नवऱ्याला बरं नाही का हो? काय झालं ? काळजीत आहात का? असं प्रेमाने विचारत राहते. आणि त्याला ते नको असत.

४) चौथं पाऊल उचलताना ऐकून घ्या की गरज ही पुरुषांच्या कृती शक्ती मागील प्रेरणा तर प्रेम हीच स्त्रीयांच्या कृतिशीलतेची प्रेरणा आहे. तूच एकमेव मला सुखी करू शकतोस ही तिची भावना, मग तिला सुखी करण्यासाठी तो कोणतेही कष्ट सहज सहन करतो. त्यातून त्याला खूप समाधान मिळतं त्याचं झगडणं त्यामुळे सोपं होतं. याअर्थी ती त्याची प्रेरणा असते. तर तिला काळजी घेणारे, थोपटणारे कोणीतरी हवे असते.

५) पाचवे पाऊल सांगते की त्याने आस्था दाखवण्याचा मार्ग आणि तिने विश्वास दर्शवण्याचा मार्ग हा दोघांनीही शोधून काढणे आवश्यक असते. आस्था आणि दया याच्यातला फरक त्याला नीट कळत नाही. दयेचा तर तो तिरस्कार करतो. खुप काळजीने तो गुदमरून जातो. काळजीने खूप प्रश्न विचारणं त्याला अविश्वास वाटतो.
तिनेही त्याच्याबद्दलच कौतूक, आदर, कृतज्ञता योग्य मार्गाने जाणीवपूर्वक त्याच्यापर्यंत पोचवावे.

६) सहावे पाऊल उचलताना सांगावेसे वाटते की ,काही स्त्रियांना त्याने सतत जवळ असावे, सततची जवळीक हवीशी वाटते. त्यामुळे तिचा आत्मसन्मान जागा होतो ,ती आनंदाचा उच्चांक गाठते. ते जर नसेल तर तिला एकदम रितेपणा जाणवतो. मात्र त्याचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरीही मनाने जवळ येण्यापूर्वी तिच्यापासून थोडं तो दूर जातो,परत जवळ येण्यासाठी. ,असे जॉन ग्रे म्हणतात. म्हणूनच त्याने जवळ यावे यासाठी थोडे दूर त्याला जावे लागते, तो परत जवळ येणारच असतो. कधीतरी तिच्या प्रेमाचा पझेसिव्हनेस त्याला त्रास देतो.

७) सातवे पाऊल उचलताना थोडे कान देऊन ऐका! स्त्री ला गरज आहे छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम मिळवण्याची. ती त्यावर खूप खुश असते. म्हणजे एखादा गजर आणणे, फिरायला नेणे, प्रेम व्यक्त करणे वगैरे. परंतु एखादी मोठी गोष्ट मिळवण्यासाठी त्याला गरज असते, कृतज्ञता आणि स्मित हास्याची पोचपावती मिळण्याची! त्या बळावर तो छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मोठ्या गोष्टी मिळवायला बघतो, कर्तृत्व सिद्ध करून बघतो.
फ्रेंड्स ! प्रत्येक पावलांवर परस्परांची वैशिष्ट्य समजून घेतली तर अर्धेअधिक संघर्ष निकालात निघतील. म्हणूनच ही सप्तपदी चालताना ती समजून घेत चालायला हवी.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER