संशयामुळे लग्न केले नव्हते या अभिनेत्याने

sanjiv kumar, nariman irani and om puri kissa

एखादा माणूस खूप संशयखोर असतो. अर्थात कधी कधी त्याचा संशय खराही असतो परंतु त्यामुळे आयुष्यात आनंद मिळत नाही. मात्र संशयखोर माणूस आनंद मिळवण्याचे वेगळे मार्ग अवलंबतो. संजीव कुमार असाच संशयखोर होता. त्यामुळेच त्याने कधीही लग्न केले नाही. संजीव कुमार (Sanjiv kumar) संशयी असल्याची माहिती त्याची मैत्रीण अंजू महेंद्रूने एका मुलाखतीत दिली होती.

पडद्यावर गंभीर भूमिका साकारणारा संजीव कुमार खऱ्या आयुष्यातही गंभीर होता. तो विनोदी चित्रपट करीत असला तरी त्याला कधी कोणी खळखळून हसताना पाहिले नव्हते. संजीवकुमारचे हेमा मालिनीवर प्रेम होते. मात्र हेमा मालिनीने त्याला भीक घातली नव्हती. दुसरीकडे सुलक्षणा पंडित त्याच्यावर प्रेम करीत होती. परंतु संजीव कुमारने सुलक्षणाचे प्रेम अव्हेरल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि नंतर तर तिने चित्रपटात काम करणेही सोडले होते. संजीव कुमारबरोबर लग्न करण्यास काही जणी तयार होत्या. परंतु संजीव कुमार लग्न करण्यास तयार होत नव्हता. याचे कारण ऐकाल तर चकित व्हाल. संजीव कुमारला असे वाटायचे की त्याच्याशी लग्न करण्यास तयार असलेल्या मुलींना त्याच्यावर प्रेम नसून त्याच्या संपत्तीवर प्रेम आहे. त्याची संपत्ती हडपण्यासाठीच त्या लग्नास तयार होत असल्याचे त्याला वाटत असे. त्याने काही मित्रांकडे हे बोलूनही दाखवले होते. त्याच्या मित्रांनी त्याला समजावलेही होते. पण त्याने ऐकले नाही आणि शेवटपर्यंत लग्न केले नाही.

एवढेच नव्हे तर त्याला मृत्यूचीही भिती वाटत असे. त्याच्या परिवारातील पुरुषांचा पन्नाशीच्या आतच मृत्यू झाला असल्याने आपलाही मृत्यू पन्नाशीच्या आतच होणार असेही त्याला वाटत असे. त्याची ही भितीही खरी ठरली होती आणि 47 व्या वर्षीच त्याचे निधन झाले. आणि प्रेक्षक एका चांगल्या अभिनेत्याला मुकला.

डॉनच्या निर्मात्याने सेटवर वाचवला होता लहान मुलाचा जीव

डॉन हा अमिताभ बच्चनचा सुपरहिट चित्रपट. अत्यंत वेगळा आणि अमिताभची दुहेरी भूमिका असलेला हा चित्रपट आजही मोठ्या आवडीने पाहिला जातो. चित्रपटाची महती अशी की शाहरुख खानलाही या चित्रपटाची रिमेक करावीशी वाटली होती. मात्र या चित्रपटाची निर्मिती अत्यंत वेगळ्या स्थितीत आणि पैसे नसताना झाली होती. चित्रपट पूर्ण झाला तेव्हा तो यशस्वी होईल याची कोणालाही (लेखक सलीम जावेद यांना सोडून) खात्री नव्हती. सलीम जावेद यांना मात्र चित्रपट हिट होईल याची खात्री होती. या चित्रपटाचे निर्माते होते नरीमन ईरानी. त्यांनी 1972 मध्ये ‘जिंदगी जिंदगी’ चित्रपट तयार केला पण चित्रपट फ्लॉप झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. मनोज कुमारच्या रोटी कपडा और मकानसाठी ते कॅमेरामन म्हणून काम करीत होते. त्याचवेळेस अमिताभ बच्चन, झीनत अमान आणि प्राण यांनी त्यांना नवीन चित्रपट सुरु करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या चित्रपटात मोफत काम करू असे सांगितले. या तिघांनीच सलीम-जावेद यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडे स्क्रिप्ट मागितील, अनेकांनी नाकारलेली डॉनची स्क्रिप्ट त्यांनी दिली, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. राजकमल स्टुडियोमध्ये शूटिंग सुरु असताना एक लहान मुलगा पडत असताना नरीमन ईरानी (nariman irani ) यांनी पाहिले आणि त्यांनी धावत त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात ते जखमी झाले. त्यांची हाडे तुटली. हॉस्पिटमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. ते बरे होऊन घरी आले पण पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. दिग्दर्शक चंद्रा बारोट यांनी चित्रपट कसा तरी पूर्ण केला. पण चित्रपट आणि त्याचे यश पाहायला नरीमन इरानी जीवंत नव्हते.

मराठी चित्रपटातून सुरुवात केली होती ओम पुरी यांनी

हिंदी चित्रपटसृष्टीत ओम पुरी यांनी कलात्मक आणि व्यावसायिक अशा दोन्ही चित्रपटात चांगले यश मिळवले होते. त्यांचा चेहरा आणि अभिनय दोन्ही प्रकारच्या चित्रपटात ते सूट होत असत. चरित्र अभिनेता, विनोदी अभिनेता, सहाय्यक अभिनेता अशा सर्व प्रकारच्या भूमिका ओम पुरी यांनी साकारल्या होत्या. त्यांना अभिनयासाठी अनेक पारितोषिके तर मिळाली होतीच पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. मात्र ओम पुरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपट घाशीराम कोतवालने केली होती. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले घाशीराम कोतवाल नाटक रंगमंचावर धुमाकूळ घालत होते. ओम पुरी एफटीटीआयमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन संघर्ष करीत होते. त्याच दरम्यान के. हरिहरन आणि मणी कौल यांनी घाशीराम कोतवाल पडद्यावर आणण्याचा विचार केला. यासाठी एफटीटीआईमधीलच 16 विद्यार्थ्यांना घेतले आणि चित्रपट पूर्ण केला. विशेष म्हणजे या कलाकारांना मानधन म्हणून एक पैसाही देण्यात आला नव्हता. त्यांना मानधन म्हणून भुईमुगाच्या शेंगा देण्यात आल्या होत्या. दुर्देवाने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मात्र ओम पुरी यांनी नंतर पितांबर काळे यांच्या 15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी या मराठी चित्रपटात काम केले. त्यावेळी ओम पुरी (om puri) यांनी घाशीराम कोतवालमध्ये मला एकही संवाद नव्हता आणि तो चित्रपट प्रदर्शितही झाला नसल्याने हाच माझा पहिला मराठी चित्रपट असे म्हटले होते. मात्र त्यांच्या दुर्देवाने हा चित्रपटही प्रदर्शित झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER