‘प्रसंग बाका आहे’, फडणवीसांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी, संजय राऊतांचे आवाहन

Sanjay Raut & Devendra Fadnavis

मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना (Corona)रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात ऑक्सिजन(Oxygen) आणि बेडसची कमतरता भासू लागली आहे. हा प्रसंग बाका आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकारण बाजूला सारून, विशेषत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केंद्र सरकारकडून (Center Govt)महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, शेवटी तेदेखील महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले.

ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राची सध्याची स्थिती बघता सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून संकटाशी सामना करायला हवा. पुढच्या काही दिवसांसाठी राजकीय मुद्दे बाजूला ठेवले पाहिजेत. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या रणांगणात उतरलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका उत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी हे आवाहन केले. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

केंद्र सरकारने नुकताच पुणे शहराला दीड लाख कोरोना लसींचा साठा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला लसींचा थेट पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होणार आहे. केंद्राच्या भूमिकेवर संशय निर्माण होईल. राज्य सरकारचं ऐकलं जात नाही, असा संदेश देशभरात जाईल, असे राऊत यांनी म्हटले.

पुण्यात भाजपची सत्ता असल्याने केंद्र सरकार हा वेगळा नियम लावत असेल तर हा उर्वरित महाराष्ट्रातील जनतेवर मोठा अन्याय आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. लोक त्यांना आपला नेता मानतात. त्यामुळे आमचं किंवा तुमचं सरकार आहे हे बघून निर्णय घेऊ नका, असेही संजय राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button