शरद पवारांची मुख्यमंत्री पदासाठी संजय राऊतांना सर्वाधिक पसंती

Sanjay Raut-Sharad Pawar

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिघांची आघाडी करून सरकार स्थापन करण्याबाबत सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिल्लीतून जाहीर झाले. आज (शुक्रवारी) मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकासआघाडी’ विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसंच पूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर येत आहे . तसेच शिवसेनेतून कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रीपद याबाबात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे , शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता खासदार संजय राऊत यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येत आहे . तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील राऊत यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे .

“शरद पवारांच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षे टिकेल”, रोहित पवारांचा दावा

दरम्यान महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याच्या मार्गावर आहे. अखेर किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं असून सत्तास्थापनेचा फॉर्म्युलाही ठरल्याचं सूत्रांनी म्हटलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदं मिळणार आहेत. २१ तारखेला निवडणूक पार पडली आणि २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मात्र शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आमच्यापुढे पर्याय खुले असल्याची भूमिका घेतली. ज्यामुळे सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सुमारे १९ दिवसांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता शिवसेना आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.