संजय राऊत, तुम्ही ‘ना यूपीएचे, ना एनडीएचे’, नाक खुपसायला मिळेल तिथले का? – भाजप

Sanjay Raut

मुंबई :- देशातील विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करायची असेल आणि यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांचा सहभाग असावा असे वाटत असेल तर यूपीएचं (UPA) नेतृत्व शरद पवार (Sharad Pawar) यांनी करावं, अशी इच्छा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा व्यक्त केली होती. मात्र संजय राऊत यांच्या या विधानावरुन शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, शिवसेना यूपीएचा भाग नाही. त्यामुळे यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलण्याचा संजय राऊतांना अधिकार नाही. संजय राऊत यांना सातत्याने काहीतरी चांगलं लिहावं लागतं. म्हणून ते अशा मागण्या करत असतात. शिवसेनेने आधी यूपीएमध्ये सामील व्हावं, त्यानंतर अशी मागणी करावी, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना यूपीएबाबत बोलण्याचा कोणी अधिकार दिला, अशा शब्दात नवाब मलिक (Nawab Malik) यांनी संजय राऊत यांनी सुनावले आहे.

संजय राऊत यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कान टोचल्यानंतर भाजपानेही त्यांना टोला लगावला आहे. भाजपा महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे संजय राऊतांवर निशाणा साधण्यात आला आहे. सोनाराने कान टोचले तर, दुखत नाही. बरं झालं मित्रपक्षानेच राऊतांची कान उघडणी केली. इतर कोण काही बोललं असत तर, सामनात एका अग्रलेखाची जागा वाढली असती. संजय राऊत तुम्ही ‘ना यूपीएचे, ना एनडीएचे’ तुम्ही नक्की कुठले? जिकडे नाक खुपसायला मिळेल तिथले का?, असा टोला भाजपाने लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘अस्तीनीतल्या सापांना दूर ठेवा’ ही बाळासाहेब, पवारांची भूमिका स्वीकारण्याची गरज – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER