संजय उवाच…. का तर उगाचच

Sanjay Raut - Editorial

Shailendra Paranjapeमहाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तापालट होईल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, तेही शिवसेना (Shiv Sena) कॉँग्रेस (Congress) राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) अशा `तीन तिगाडा काम बिगाडा’ सरकारचे, हेही कुणाला वाटले नसेल. पण महाभारतातल्या दिव्यदृष्टी संजयाप्रमाणेच शिवसेनेचे दूरदृष्टी संजय राऊत यांना मात्र हे माहीत होतं.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी पुण्यात येऊन सर्व विषयांवर मतप्रदर्शन केलंय. अर्थात, विधानसभेवर भगवा फडकावण्याबद्दल शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी आत्तापासूनच कामाला लागावं, या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानावर संजय राऊत काही बोलले वा नाही, हे समजू शकलेले नाही. गेली तीस वर्षे भगवा फडकावण्याची भाषा ऐकतोय, या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेवरही राऊत काही बोलल्याचे दिसत नाही.

राऊत यांनी शरद पवार यांच्याविषयी गौरवोद्गार काढून पवार साहेबांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता पुण्यात आहे, असं म्हटलंय. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत, असंही संजय राऊत म्हणाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालंय. शरद पवार वगळता पुण्यात कोण प्रमुख लोक आहेत, याची उत्सुकता निर्माण झालीय. कारण नुकतेच करोना संसर्गमुक्त झालेले अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही पुण्याच्या कोथरूड विधानसभेचे आमदार आहेत.

त्याशिवाय बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) याही पुण्यात आहेत. हेच ते सारे प्रमुख लोक, असं संजय राऊत यांना अभिप्रेत आहे का… खूप आठवूनही या चार पाच जणांपेक्षा वेगळे नेमके कोण प्रमुख लोक संजय राऊत यांना अपेक्षित आहेत जे पुण्यात आहेत, हे काही लक्षात येत नाही.

संजय राऊत यांनी एक विनोदी विधानही केलंय. उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री होता म्हणून करोना संकटकाळात महाराष्ट्र यशस्वी मुकाबला करू शकला, असं ते म्हणालेत. उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दुसरे कोणीही या पदावर असते तर राज्यात अराजक माजले असते, हे राऊत यांचे विधान विनोदीच आहे, हे शेंबडं पोरही सांगेल. उद्धव ठाकरेंनी करोनाच्या लढ्यात नेतृत्व केलं, असं आणखी एक विनोदी विधान राऊत यांनी केलंय. ठाकरे यांनी नेतृत्व केलं आणि ते राऊत यांना मान्य आहे पण ठाकरे यांच्याच भाषेत विचारायचं तर ठाकरे यांनी नेतृत्व केलं हे करोनाच्या विषाणूला मान्य आहे का….

राज्यपालांना मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारांना विनंती करेन, असंही राऊत म्हणाल्याचं प्रसिद्ध झालंय. हे विधान विनोदी नाही तर आक्षेपार्ह आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरण आणि अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने राजभवनला दिलेली भेट, तिने शिवसेनेवर केलेली टीका या विषयावरून राज्यपालांवर राऊत यांचा राग समजू शकतो. पण एक धडाडीचे संपादक, पत्रकार आणि पक्षप्रवक्ते असलेले राऊत पवारसाहेबांची अँपाइंटमेंट घ्यायचे आणि त्यांच्याकडे रदबदली करण्याचे कामही करतात, हे त्यांनीच सांगितलंय, हे बरे झाले. खरे तर राऊत यांच्या या मध्यस्थीची गरज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जास्ती आहे. दुसरे असे की राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, याचं भान किमान संपादक राऊत यांनी ठेवायला हवं, असं वाटतं.

रोजच्या रोज टीव्ही वाहिन्यांना बाईट देताना तो चटकदार, विकाऊ व्हायला हवा असतो, त्यामुळे तसं बोलायची सवय लागू शकते. पण घटनात्मक पदावरच्या व्यक्तींबद्दल बोलताना भान राखायला हवे, असे वाटते.

काऊंटर आर्ग्युमेंट म्हणून राज्यपालांनी त्यांची जबाबदारी पार पाडली का, पवारसाहेबांनी कशी राज्यपालांची खिल्ली उडवली वगैरे दाखले दिले जातील. पण मध्यंतरी थिल्लरपणावरून जो वाद झाला तसाच हाही प्रकार आहे, असे वाटते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. राऊत यांच्याकडे जगातल्या सर्व विषयांवर भाष्य आणि मत आहे, ही प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

त्याचे कारणही वर उल्लेख केलेलेच आहे. टीव्हीवाल्या पत्रकारांची गरज आणि रोज उठून विचारतील त्या विषयावर प्रतिक्रिया द्यायची सवय, याचंच दर्शन राऊत यांच्या पुणे भेटीत घडलं.

सत्तारूढ पक्षात असताना प्रसिद्धी, टीव्हीवाले यांची गरज लागत असेल तर सूज्ञांस सांगणे न लगे. घोडा मैदान जवळ आहे.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER