संजय राऊत, ‘हरामखोर’ कुणाला म्हटले होते? सांगा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Kangana Ranaut - Bombay High Court - Sanjay Raut

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतचे (Kangana Ranaut) कार्यालय तोडण्याच्या कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीत विवादित ‘हरामखोर’ शब्दावरूनही तुंबळ युक्तिवाद झाला. शिवसेनेचे (Shiv Sena) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून वापरला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले.

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात काही दिवसांपूर्वी जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. कंगनाने मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार आणि मुंबईबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कारवाई करत तिच्या कार्यालयातील कथित अनधिकृत बांधाकाम पाडले होते. ही कारवाई सुरू असतानाच कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने कंगनाच्या वकिलांना बीएमसीच्या कारवाईशी संबंधित फाईल आणि संजय राऊत यांच्या दोन्ही मुलाखतींच्या क्लीप घेऊन येण्यास सांगितले. यापूर्वी कंगनाच्या कार्यालयात झालेल्या कारवाईबाबत बीएमसीच्या वकिलांनी सांगितले की, कंगना सांगते की ही सर्व कारवाई त्यांच्या ५ सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमुळे झाली आहे. मग ते ट्विट नेमके काय होते, हे न्यायालयासमोर सादर झाले पाहिजे, ज्यामुळे ‘टायमिंग’ची माहिती मिळू शकेल.

कंगनाच्या वकिलांनी सांगितले की, कंगनाने सरकारविरोधात काही विधाने केली होती. तिच्या एका ट्विटवर संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. तसेच कंगनाला धडा शिकवला पाहिजे, असे राऊत म्हणाले होते. दरम्यान, कंगनाचे वकील बीरेंद्र सराफ यांनी संजय राऊत यांनी हरामखोर शब्द वापरलेली व्हिडीओ क्लीप न्यायालयात सादर केली.

संजय राऊत यांच्या वकिलांने यावर म्हटले की माझ्या अशिलाने कुणाचेही नाव घेतलेले नाही. त्यावर, राऊत यांनी हा शब्द कंगनासाठी वापरला नव्हता तर आम्ही हे विधान रेकॉर्ड करू शकतो का असा सवाल न्यायालयाने राऊत यांचे वकील प्रदीप थोरात यांना केला. तेव्हा थोरात यांनी आपण याबाबत उद्या प्रतिज्ञापत्र सादर करू असे सांगितले. संजय राऊत यांच्या दोन्ही मुलाखतींच्या चित्रफिती न्यायालयात सादर केल्या जाणार आहेत. ज्यात राऊत हा आक्षेपार्ह शब्द वापरत आहेत आणि दुसऱ्यामध्ये त्याचा अर्थ सांगत आहेत.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणारून कंगना राणौत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये बऱ्याच काळापासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. कंगनाने अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर बीएमसीने तिच्या कार्यालयात अवैध बांधकाम झाल्याची नोटीस देऊन दुसऱ्याच दिवशी तिचे कार्यालय तोडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER