विरोधकांनी सरकार पडण्याच्या तारखा देणे बंद करावे, ठाकरे सरकार मजबूत – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- राज्यातील महाविकासआघाडीचा (Mahavikas Aghadi) महासिनेमा २०२४ पर्यंत नक्कीच चालणार आहे.विरोधकांनी आता सरकार पडण्याच्या तारखा देणे बंद करावे. भाजपने (BJP) पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडावी, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकास आघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असा मिस्कील टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या तीन महिन्यांत महाराष्ट्रातील सरकार पडणार, या विधानाचा समाचार घेतला. महाराष्ट्रातील सरकारचं २०२४ नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, या तारखेला पडेल ही धमकी देणं बंद करावं. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केले. खरं खोटं नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे, असा सूचक इशारा देणारे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. तीन महिन्यांत सरकार पडेल, हा सुधीरभाऊंचा विनोद चांगला होता. त्यांनी आधी बंगालचं बघावं. आधी बंगालमधून तर निवडून या. राज्यातील प्रमुख नाट्यनिर्माते आम्हाला फोन करतात. काही सवलत देण्याची मागणी करतात. मात्र, त्याची काही गरज नाही. सुधीर मुनगंटीवार यांचे विनोदी कार्यक्रम ठेवले तर तुफान गर्दी होईल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

‘सामना’त अग्रलेख लिहला गेला म्हणजे घाव वर्मी बसला, असे विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस सामना वाचतात ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना जगात काय सुरु आहे, हे कळेल. सामानाची दखलसंपूर्ण जग घेते. देवेंद्रजींनी सामना वाचायची सवय लागली असेल तर कौतुक आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘विरोधक जिंकले असे वाटत असेल तर तो गैरसमज’, वाझेंच्या बदलीवरून शिवसेनेचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER