संजय राऊतांच्या ‘रोखठोक’ प्रश्नांचा शरद पवार करणार ‘सामना’

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची आणखी एक लक्षणीय मुलाखत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मुलाखत शिवसेनेचे ‘सामना’वीर नेते आणि खासदार संजय राऊत घेणार आहेत. २९ डिसेंबरला पुण्यात पवारांची जाहीर मुलाखत घेणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. ‘शरद पवार यांची मी नेहमीच भेट घेत असतो. काही भेटी राजकारणापलीकडच्याही असतात.’ असं राऊत म्हणाले.

 राऊत आणि पवार यांच्या जावळिकीची नेहमीच चर्चा होते. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर राऊत कोणत्या विषयांवर पवारांना बोलतं करणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. सत्तास्थापनेमागील काही गुपितं आणि किस्से उलगडले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात ज्या दोन नेत्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, ते पवार आणि राऊतच पाहुणे आणि मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. राऊत कोणते प्रश्न विचारणार, ‘बोलंदाज’ संजय राऊत शरद पवारांना गुगली टाकणार की वाक्चतुर शरद पवारच राऊतांना ‘क्लीन बोल्ड’ करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संजय राऊत यांनी आज नागपुरात शरद पवारांची भेट घेतली. या भेटीतही शरद पवारांच्या महामुलाखतीची चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. याच महिन्याच्या अखेरीस, २९ डिसेंबर रोजी या मुलाखतीचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे.