संजय राऊत सरकारला खाणार?

Kareem Lala Indira Gandhi And Sanjay raut Editorial

badgeसामान्य माणूसही जे बोलताना दहादा विचार करेल ती गोष्ट काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलून गेले. ‘मुंबईचा एकेकाळचा डॉन करीम लाला याला भेटायला इंदिरा गांधी जात होत्या’ ह्या त्यांच्या वक्तव्याने राजकारण तापले आहे. दुसऱ्याच दिवशी राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. पण त्याने उद्धव सरकारला झालेले नुकसान भरून निघणारे नाही. सरकार लगेच पडणार नाही; पण सुरुवात झाली आहे. आता एकमेकांची अंडीपिल्ली काढणे सुरू होईल.

संजय राऊत असे का बोलले असावेत याचीच चर्चा आहे. उद्धव यांची संमती असल्याशिवाय राऊत असे बोलण्याची हिंमत करतील असे वाटत नाही. तसे नाही तर मग दुसरी काय भानगड आहे? भावाला मंत्रिपद नाकारल्याने संजय राऊत अस्वस्थ आहेत. सत्तास्थापनेचे काम झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना सायडिंगला टाकले आहे, असे ‘मातोश्री’वरचे लोक सांगतात. उद्धव यांनी वापरून टाकून दिल्याने राऊत यांना वैफल्य आल्याचे त्यांच्या जवळचे लोक सांगतात. तसे असेल तर भविष्यात राऊत अनेक भूकंप घडवून आणू शकतात.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार बनले आहे. यातली शिवसेना ही तर काँग्रेसविरोधावरच पोसली गेली. पण काँग्रेसचा विरोध विसरून जायचा ह्या अटीवरच सोनिया गांधींनी सरकारमध्ये बसायला मंजुरी दिली होती. हे सारे ठाऊक असताना संजय राऊत ह्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने इंदिरा गांधींबद्दल असे जाहीर वक्तव्य करावे याचे आश्चर्य आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दम दिल्यानंतर राऊत नरमले; पण पोळा फुटला आहे. आता एकमेकांच्या नेत्यांविरुद्ध आरोप सुरू होतील. कुणी शरद पवारांबद्दल बोलेल तर कुणी उद्धव यांच्याबद्दल. हिंदुत्वाचा नाजूक मुद्दा आहेच. हे सरकार अस्थिर असेल याचा अनुभव तिसऱ्याच महिन्यात येतो आहे.

यापुढं अशी वक्तव्यं खपवून घेणार नाही ; थोरातांनी शिवसेनेला फटकारले

इंदिरा गांधींबद्दल एवढे बोलले जाऊनही काँग्रेस नेत्यांकडून हवा तसा निषेध उमटला नाही. आलेल्या प्रतिक्रिया अतिशय मवाळ होत्या. हेच वक्तव्य बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार यांच्याबद्दल केले असते तर एव्हाना मुंबई पेटली असती; पण काँग्रेसवाले थंडगार आहेत. उद्धव हेही गप्प आहेत. सत्तेचा मोह माणसाला किती खच्ची करतो त्याचा हा नमुना आहे. पाच वर्षे उपाशी असलेले नेते सरकारमध्ये आले आहेत. कुणी काहीही बोलो, त्यांना फरक पडत नाही. राहुल गांधी यांना कुणी गरम केले तरच हे सरकार पडू शकते.

राऊत यांनी भाजपच्या हाती आयते कोलीत दिले आहे. संजय राऊत भयंकर बोलले आहेत. ‘हाजी मस्तानच्या स्वागतासाठी मंत्रालय खाली उतरून यायचे’ असे राऊत म्हणतात. तसे असेल तर मग ‘अंडरवर्ल्ड काँग्रेसला फायनान्स करीत होते का?’, ‘मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असेल ते हे डॉन ठरवत होते का?’ हे प्रश्न विचारून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला घेरले आहे.

राजकारण हा कोळशाचा धंदा आहे असे म्हणतात. अनेक चांगल्या-वाईट लोकांना भेटावे लागते. तरीही साधनशुचितेची अपेक्षा राजकारण्यांकडून केली जाते. ‘स्नानगृहात सारेच नग्न असतात’ तरीही दगड मारण्याची हौस जात नाही. ‘दाऊदला कॉलर पकडून खेचून आणू’ अशा गर्जना एकेकाळी भाजपवाले करीत होते. पण दाऊद आजही कराचीत आरामात मौज करीत आहे. त्यामुळे सरकारला काहीही होणार नाही. कारण सत्तेची मलाई सर्वांनाच चाखायची आहे.