‘आज तर आकाशात कावळेही दिसले नाहीत !’ संजय राऊतांनी उडवली भाजपची खिल्ली

Samjay Raut

मुंबई : कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप महाराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे. भाजपचे नेते काळे झेंडे घेऊन राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरले. राज्यभरातील भाजपच्या नेत्यांनी आज आपापल्या घरासमोर निदर्शनं केली. काळ्या फिती लावून, काळे झेंडे उंचावून त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. अनेकांनी काळ्या रंगाचा मास्क लावून फलक दाखवले. या आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.

विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यामुळे ते हे आंदोलन करत आहेत. भाजपचे हे आंदोलन पूर्णत: फसलेलं आहे. हे फक्त भाजप नेत्यांचं आंदोलन होतं. त्यात जनता सहभागी झालीच नाही. किंबहुना आज तर आकाशात कावळेही दिसले नाहीत. त्यांचं ते काळं आंदोलन आहे ना? बहुतेक आज कावळे घरट्यांमध्ये बसलेत. त्यांच्यावर कुठला ठपका नको म्हणून, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा यांनी काळ्या चड्ड्या, काळी बनियन घालून आंदोलन केलं असतं तर महाराष्ट्रानं त्यांची पाठ थोपटली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकार अपयशी ठरलंय असं या काळात सांगणं महाराष्ट्राच्या जनतेशी द्रोह आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपण एक युद्ध लढतोय. त्यात पुढे जात असताना अशा प्रकारे अडथळे निर्माण करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER